WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

आदर्श कलावंत पुरस्काराने शाहीर भिकाजीबुवा चोगले यांचा सन्मान


आदर्श कलावंत पुरस्काराने शाहीर भिकाजीबुवा चोगले यांचा सन्मान

चिपळूण : नवभारत नवराष्ट्र या रत्नागिरी-सिंधुदुर्ग विभागीय वृत्तपत्राच्या वतीने कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आदरणीय शाहीर भिकाजी बुवा चोगले यांना “आदर्श कलावंत” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. चिपळूण येथील अतिथी हॉलमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव व नगरपालिका आरोग्य सभापती शुभम पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भिकाजी बुवा चोगले यांना सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

गेल्या ४५ वर्षांपासून जाखडी, भजन, नमन, सनई वादन, डफावरील गाणी आणि ढोलकी वादन या विविध लोककलेच्या माध्यमातून भिकाजीबुवांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या बहुआयामी कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कलावंत म्हणूनच नव्हे तर समाजसेवक म्हणूनही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. गरजू लोकांना मदत करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे अशा विविध माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आहे. स्वामी उदयानंद गिरी आणि स्वामी विद्यानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भक्तीमार्गातून त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे.

संगमेश्वरवासीय गवळी सेवा संघाचे संस्थापक, तसेच कलगी तुरा उन्नती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. आपल्या हॉटेल व्यवसायासोबतच त्यांनी समाजकार्य आणि कला जोपासत अनेक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

या सोहळ्यात जेष्ठ समाजसेवक संभाजी महाडिक यांनाही समाजसेवेसाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भिकाजीबुवा चोगले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करणाऱ्या आणि आपल्या कलेने समाजाला एकतेचा संदेश देणाऱ्या या गुणी कलावंताच्या कार्याचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!