WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी RPIमध्ये सक्रिय व्हावे : उमेश सकपाळ


जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी RPIमध्ये सक्रिय व्हावे : उमेश सकपाळ

ना. रामदास आठवले यांच्या उपस्थितीत १६ ऑगस्टच्या जिल्हा मेळावा

चिपळूण, ता. ११ ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ व जुन्या जाणत्या कार्यकर्ते तसेच आंबेडकरी विचारधारेवर विश्वास असणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सक्रिय होऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुढे यावे. सत्तेपेक्षा चळवळ हीच आपली ताकद आणि संरक्षण आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे आवाहन RPIचे चिपळूण तालुका सरचिटणीस उमेश सकपाळ यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात RPIची संघटनात्मक पायाभरणी करण्यामध्ये अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. चिपळूण तालुक्यात विचारवंत दयानंद मोहिते, विठोबा पवार, एम. बंदुकवाले, रमाकांत सकपाळ, सुभाष मोहिते, जयंत जाधव, राजू जाधव, भालचंद्र सावंत, जयराम मोहिते, के. एस. कदम, बी. के. जाधव, मनोहर मोहिते, मिलिंद गमरे, सिताराम कदम, दगडू कदम, चंद्रमणी पवार, के. डी. कदम, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना उभी करण्यासाठी योगदान दिले. यातील काही कार्यकर्त्यांचे निधन झाले असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे.

सन १९८९ मध्ये चिपळूण येथील रमाबाई गोखले सभागृहात जिल्हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करण्यात आला. त्यानंतर चिपळूण तालुका कमिटीचे पहिले अध्यक्ष म्हणून तुकाराम जाधव, तर सरचिटणीस म्हणून सुभाष मोहिते यांनी जबाबदारी स्वीकारली. पुढे सुभाष मोहिते यांनी तालुका अध्यक्ष म्हणून आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात पक्षाचे संघटन उभे करण्यासाठी प्रयत्न केले. आठवले यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकरी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकवटले होते.

पुढील काळात जी. बी. मोहिते, संजय गमरे, रवी कांबळे, रमण मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या सर्वांच्या योगदानामुळे चिपळूण तालुक्यात RPIच्या चळवळीला एक वैचारिक आणि संघटनात्मक आधार मिळाला.

रामदास आठवले हे प्रतिकूल परिस्थितीतून आणि संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. अन्याय-अत्याचाराच्या घटनांमध्ये धावून जाणारा, छोट्या-मोठ्या प्रत्येक कार्यकर्त्याला भेटणारा, त्याच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणारा आणि सातत्याने जनतेमध्ये राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वामागे कार्यकर्ते आणि समाजातील विविध घटक उभे राहिले आहेत, असे सकपाळ यांनी सांगितले.

बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी वेळोवेळी धाडसी राजकीय भूमिका घेतल्या. शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग असो किंवा सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपसोबतची राजकीय साथ असो, या भूमिकांवर त्यांच्यावर टीका-टिप्पणीही होत आली आहे. मात्र, सत्तेत राहून समाजाच्या प्रश्नांना न्याय देणे, विकासाची कामे मार्गी लावणे आणि आंबेडकरी विचारधारेचा प्रसार करणे हा आपला उद्देश असल्याची भूमिका आठवले यांनी अनेकदा स्पष्ट केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले भारतीय संविधान, संसदीय लोकशाही आणि सामाजिक समतेची मूल्ये हीच आंबेडकरी चळवळीची मूलभूत शक्ती आहे. राजकीय सत्तेच्या समीकरणांमध्ये अनेक पक्षांसोबत आघाडी किंवा राजकीय सहकार्य झाले तरी आंबेडकरी विचारधारा आणि चळवळीचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आंबेडकरी विचारधारेवर विश्वास असणाऱ्या नेते, कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवून चळवळीच्या बळकटीसाठी एकत्र येण्याची गरज आहे, असेही सकपाळ यांनी नमूद केले.

सत्तेपेक्षा चळवळ महत्त्वाची असून, चळवळ मजबूत करणे हीच आजची गरज आहे. त्यामुळे चिपळूण तालुक्यातील RPIच्या जुन्या-जाणत्या कार्यकर्त्यांसह नव्या पिढीतील कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सक्रिय व्हावे. आगामी १६ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जिल्हा मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन पक्ष संघटना आणि आंबेडकरी चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन उमेश सकपाळ यांनी केले आहे.


619
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!