WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

हिंगोली-परभणी पुन्हा भूकंपाने हादरले!


हिंगोली-परभणी पुन्हा भूकंपाने हादरले!

🔴मध्यरात्री ४.६ रिश्टरसह सलग चार धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

🔴पांग्रा शिंदे व काकडधाबा परिसर केंद्रस्थानी; मंदिरांच्या भोंग्यांवरून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

हिंगोली : महाराष्ट्रातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले भूकंपाचे सत्र अद्यापही कायम असून, बुधवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा सलग तीन ते चार भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुके तसेच शेजारील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही हे धक्के स्पष्टपणे जाणवले.

यापूर्वी २ जुलै रोजी आलेल्या भूकंपानंतर अवघ्या आठवडाभरात पुन्हा तीव्र धक्के बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून अनेकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव रात्र घराबाहेरच काढली.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) आणि स्थानिक भूकंपमापक केंद्राच्या माहितीनुसार, मध्यरात्री १.३७ वाजता सर्वात तीव्र ४.६ रिश्टर स्केल क्षमतेचा मुख्य भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे गावाच्या दक्षिणेकडे सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा धक्का बसण्यापूर्वी भूगर्भातून मोठा गडगडाटासारखा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर जमीन हादरली.

मुख्य धक्क्यानंतरही परिसरात भूकंपाचे हादरे सुरूच राहिले. रात्री २.१५ वाजता ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का, तर २.१७ वाजता ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा तिसरा धक्का नोंदविण्यात आला. या दोन्ही भूकंपांचे केंद्र पांग्रा शिंदे गावाच्या पश्चिम-उत्तरेकडील काकडधाबा परिसरात असून त्यांची खोलीही सुमारे १० किलोमीटर होती. त्यानंतर ३.२३ वाजता आणखी एक सौम्य धक्का जाणवला.

अचानक आलेल्या या धक्क्यांमुळे गावागावांत एकच खळबळ उडाली. अनेक गावांमध्ये मंदिरांवरील ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून नागरिकांना तातडीने जागे होण्याचे आणि मोकळ्या जागेत जाण्याचे आवाहन करण्यात आले.

घाबरलेल्या नागरिकांनी लहान मुले, महिला आणि वृद्धांना घेऊन घराबाहेर धाव घेतली. अनेक ठिकाणी लोकांनी रस्ते, मैदाने आणि मोकळ्या जागांमध्ये रात्र काढली.

भूकंपामुळे पांग्रा शिंदे आणि काकडधाबा परिसरातील काही जुन्या व मातीच्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याची तसेच किरकोळ मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या भागात यापूर्वी ११ एप्रिल २०२६ रोजी ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्या घटनेच्या आठवणी ताज्या असतानाच पुन्हा बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. याशिवाय २ जुलै २०२६ रोजीही अवघ्या दहा तासांच्या अंतरात दोन भूकंप झाले होते. पहिला मध्यरात्री १.२० वाजता औंढा नागनाथ परिसरात, तर दुसरा सकाळी १०.१४ वाजता लोहरा परिसरात झाला होता. त्या भूकंपाचे हादरे धाराशीव जिल्ह्यापर्यंत जाणवले होते.

भूकंपतज्ज्ञांच्या मते, या परिसरात सुरू असलेल्या सूक्ष्म भूगर्भीय हालचाली, स्थानिक भूगर्भीय रचना तसेच पावसाळ्यात वाढणारा पाण्याचा दाब यांसारख्या कारणांमुळे अशा प्रकारचे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असावेत. परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!