WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

युवकांनी राष्ट्रहितासाठी भाजपमध्ये सहभागी व्हावे : कृष्णराज महाडिक


युवकांनी राष्ट्रहितासाठी भाजपमध्ये सहभागी व्हावे : कृष्णराज महाडिक

चिपळूण : “युवा पिढी चालू लागली की नवे मार्ग तयार होतात. त्यामुळे युवकांसाठी पुढील काळ वैभवशाली आहे. राष्ट्रहितासाठी सर्व युवकांनी भाजपसोबत जोडले जावे,” असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी चिपळूण येथे केले. शहरातील शिक्षक भवन सभागृहात शुक्रवारी सायंकाळी आयोजित युवाशक्ती जागर यात्रा कार्यक्रमात ते बोलत होते. नवी मुंबईपासून सुरू झालेल्या या कोकण दौऱ्यात चिपळूणमध्ये त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

महाडिक म्हणाले, कोकणाचा निसर्ग आणि येथील माणुसकी आपल्याला नेहमीच आकर्षित करते. भाजप हा पक्ष सर्वांना परिवाराप्रमाणे वागणूक देतो. त्यामुळे युवकांनी संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे युवा मोर्चावर विशेष लक्ष असल्याचे सांगत त्यांनी युवकांसाठी पुढील काळ संधींचा असल्याचा विश्वास व्यक्त केला. युवकांनी केवळ राजकीयच नव्हे तर क्रीडा, सामाजिक आणि नेतृत्व विकासाच्या क्षेत्रातही पुढे यावे, असे आवाहन करत महाडिक यांनी स्वतःच्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवांनाही उजाळा दिला. “आपणही एक खेळाडू होतो आणि त्या माध्यमातून देशाला रेसिंगमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले,” असे सांगत त्यांनी उपस्थित युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांनी प्रास्ताविकातून जिल्हाभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्ह्यात युवाशक्तीचे मजबूत संघटन उभे राहत असून आगामी काळात युवा पिढी भक्कमपणे पक्षासोबत उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी तालुक्यात विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. राहुल पवार यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे स्वागत करण्यात आले. युवा कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला.

दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या कार्याचा गौरव करत महाडिक यांनी वाशिष्ठी प्रकल्पाच्या कामाचे कौतुक केले. युवकांनी संघटन उभे करून समाजहिताचे चांगले काम करावे, असा संदेशही त्यांनी दिला.

या कार्यक्रमास भाजप नेते वैभव खेडेकर,उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, शहर सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चा शहराध्यक्ष, नगर पालिका आरोग्य सभापती शुभम पिसे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे, शहराध्यक्ष व नगरसेविका रसिका देवळेकर, वैशाली निमकर, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवाशक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून युवकांना संघटनात्मक बळ देण्याबरोबरच राष्ट्रहितासाठी प्रेरित करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!