WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कर भरा, कारवाई टाळा!


कर भरा, कारवाई टाळा!

चिपळूण नगर पालिकेची मोहीम तीव्र

आतापर्यंत १० कोटी ७० लाखांची कर वसुली

चिपळूण : कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने मोहीम तीव्र केली असून आतापर्यंत १० कोटी ७० लाख १४ हजार रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ९ पथके शहरात वसुलीचे काम करत असून कर वसुलीचा टक्का वाढावा यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात आले आहे. या शिवाय घंटागाड्यांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे कर भरण्याचे आवाहन केले जात आहे.

नगर परिषदेला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी मिळून चालू वर्षासह थकीत करातून १८ कोटी ८६ लाख रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत १०.७० कोटी रुपये वसूल झाले असून अजून ८ कोटी ८६ लाख रुपये वसुली बाकी आहे. शासनाने १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले असल्याने प्रशासनाने यासाठी विशेष मोहीम राबवली आहे.
मुख्याधिकारी संजय जाधव व उपमुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर यांच्या समन्वयातून कर निरीक्षक दिलीप शिंदे व सहाय्यक कर निरीक्षक सुशांत मोहिते नोडल अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. विभागप्रमुखांसह एकूण ९ पथके शहरात वसुली मोहीम राबवत आहेत.

नागरिकांना कर भरणे सोपे व्हावे यासाठी अभिलेख व भांडार विभाग प्रमुख वलिद वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सुविधा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच काही नागरिक ऑनलाईन पद्धतीने कर भरत असल्याने वसुलीला मदत होत आहे.

दरम्यान, शहरातील प्रभागांमध्ये फिरणाऱ्या घंटागाड्यांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. “वेळीच कर भरा, कारवाई टाळा” असा संदेश नागरिकांना दिला जात आहे.

प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की सुमारे ७०० करदाते कर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे अशा थकबाकीदारांना २४ तासांत कर भरण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. प्रशासनाच्या कारवाईच्या भीतीने काही थकबाकीदार कर भरण्यास पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून येत्या काही दिवसांत उर्वरित वसुली पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यानंतरही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.


करातून मिळणाऱ्या निधीतून शहरातील विकासकामे केली जातात. तसेच शासनाकडून मिळणारा निधीही कर वसुलीवर अवलंबून असतो. त्यामुळे शहराचे नुकसान होऊ नये यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरून प्रशासनाला सहकार्य करावे.

संजय जाधव, मुख्याधिकारी.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!