चिपळुणात 12 मार्चला ‘आरोही– सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी’ विशेष कार्यक्रम
चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षिततेसह डिजिटल सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन – WDW महाराष्ट्र व रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून महिलांनी ऑनलाइन फसवणूक, आर्थिक गुन्हे आणि सोशल मीडिया संबंधित धोके याबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महिलांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृतीपर व्याख्यान, सायबर तज्ज्ञ, पोलीस अधिकारी, डॉक्टर व वकील जर्नलिस्ट यांचे पॅनेल डिस्कशन, तसेच IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर हेल्पलाईनचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याशिवाय समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “आरोही नारी गौरव पुरस्कार” देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमात “छावा” विशेष आकर्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम – डिजिटल जागर यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम दि. १२ मार्च २०२६ रोजी सायं. ४ ते ७ या वेळेत इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












