परिमल भोसले धडाडीचा कार्यकर्ता : आ. निलेश राणे
असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत केला प्रवेश
चिपळूण : परिमल भोसले हा धडाडीचा कार्यकर्ता आहे. आपण व परिमल गेली अनेक वर्ष एकत्र काम करीत आलो आहोत. परिमलसारखे चिपळूणमध्ये असंख्य कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सोबत राहिले. कदाचित त्यांच्यासाठी काही करू शकलो नसलो तरी ते आपल्या सोबत सावलीसारखे उभे राहिले. आता परिमल भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश विश्वासाने होतात. अगोदरचे कुटुंब सोडून पण दुसऱ्या कुटुंबामध्ये सहजपणे येत नाहीत. तिथे काहीतरी दुखावलं होतं. तिकडे काहीतरी काम झाले नाही म्हणून आपल्या पक्षांमध्ये आले. त्यांना आता आपलं कुटुंब वाटले पाहिजे, तेव्हा तो पक्षवाढीसाठी कामाला लागतो. परिमल भोसले आणि आपण सगळे सहकारी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलात. मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आणि आपण सगळ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन परिमलला पाठबळ दिलंत, त्याला सहकार्य केलंत. याबद्दल मनापासून आपला आभारी आहे अशी भावना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केले.

भाजप माजी जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या उपस्थित पार पडला. प्रवेशाप्रसंगी बोलताना आ. राणे यांनी परिमल भोसले यांना उद्याच्या राजकीय भवितव्याची काळजी करू नको, तुझं भविष्य नक्कीच शंभर टक्के शिवसेनेत यशस्वी होईल, असा विश्वास दिला.

परिमल भोसले यांच्यासह भाजप माजी कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, माजी सेक्रेटरी उदय घाग, माजी बुथ अध्यक्ष सुधीर पानकर, मनसे माजी विद्यार्थी तालुकाध्यक्ष गुरुप्रसाद पाटील, प्रहार संघटना तालुका अध्यक्ष सचिन गाडे, सर्वेश सातपुते मंगेश शिंदे, अमित शिंदे आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यावेळी शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख संदेश आयरे, जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती रश्मी गोखले, नगरसेवक निहार कोवळे, कपिल शिर्के, अंकुश आवले, नगरसेविका सौ. पल्लवी महाडिक, सौ. निलम जाधव, सौ. हर्षाली पवार, शिवसेना चिपळूण तालुका समन्वयक दिलीप चव्हाण, रुपेश घाग, माजी नगरसेवक करामत मिठागरी आदी उपस्थित होते.
पक्षप्रवेश कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले.
चिपळूणमधील असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केले : आ. निलेश राणे
यावेळी आ. राणे पुढे म्हणाले की, परिमल आणि आपण गेली अनेक वर्ष मध्यंतरीचा काळ वगळता एकत्र काम करीत आला आहोत. काँग्रेसमध्ये असताना भोसले यांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली. या पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी तो झटत होता. परिमल सारखे असंख्य कार्यकर्ते आपल्याला चिपळूणमध्ये मिळाले. या कार्यकर्त्यांनी आपल्यावर जीवापाड प्रेम केले. खरोखरच मला देवासारखे सहकारी मिळाले, अशा शब्दात कार्यकर्त्यांप्रती आपली भावना व्यक्त केली. आता तुम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परिमल तुझ्यासह सर्व सहकाऱ्यांनी काही काळजी करू नका. राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सपकाळ यांच्यासह आम्ही सर्वांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे, असेही स्पष्ट केले.
परिमल भोसले स्वगृही; शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू : सदानंद चव्हाण
शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्या मनोगतात परिमल भोसले स्वगृही परतले आहेत. त्यांचे गुरु आ. निलेश राणे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश झाला आहे. खरोखरच कार्यकर्त्याच्या पाठीशी नेतृत्व खंबीरपणे कसे उभे राहते, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. शिवसेनेत जोरदार ‘इनकमिंग’ सुरू आहे. पक्षाला बळकटी मिळत आहे. प्राण्यांचं नेतृत्व कोकणाला लाभले आहे आपण नशिबवान आहोत. राणे कुटुंबियांचे काम आपण जवळून पाहिले आहे. मुख्यमंत्री असताना राणे यांनी जास्तीत जास्त फाईलचा निपटारा केला होता. या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण शिवसेनेत प्रवेश केला आहे. अजूनही मोठे प्रवेश होतील. पक्षाची शिस्त लोकाभिमुख विकासात्मक कामे होणे महत्त्वाचे आहे. आपला कोणताही भ्रमनिरास होणार नाही. आपण सर्वजण हातात हात घालून काम करू, असा विश्वास चव्हाण यांनी प्रवेशकर्त्या परिमल भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांना दिला.
शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी : उमेश सकपाळ
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या मनोगतात परिमल भोसले यांना आपण उक्ताड भागातून उभे राहिला असता तर नगरसेवक झाला असतात. तरी येत्या काळात तुम्ही उक्ताड भागात चांगले काम करा, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असा विश्वास सकपाळ यांनी भोसले यांना यावेळी दिला.
‘कट्टर राणे समर्थक-कट्टर शिवसैनिक’ हेच आपले पद : परिमल भोसले
माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी आ. निलेश राणे आमचे दैवत असल्याचे सांगितले. शिवसेना कुटुंबात प्रवेश केला आहे, याचा आनंद वाटतो. राणेसाहेब लवकरच मंत्री व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त करताना पक्ष आपल्यावर जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू. ‘कट्टर राणे समर्थक- कट्टर शिवसैनिक’ हेच आपले पद असेल असे स्पष्टपणे सांगितले. या पक्षप्रवेश सोहळ्याचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.













