WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दर्जेदार कामांवर भर द्या : नगराध्यक्ष उमेश सकपाळ 


दर्जेदार कामांवर भर द्या : नगराध्यक्ष उमेश सकपाळ 

चिपळूण नगर पालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न

चिपळूण : चिपळूण नगर पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. चिपळूण शहराला स्मार्ट सिटी करण्याचे स्वप्न नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांचे असून, आजपासून पुढे होणारी सर्व कामे दर्जेदार आणि टिकाऊ कशी होतील, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले. कामे दर्जेदार झाली, तर वारंवार दुरुस्तीसाठी होणारा खर्च टळेल, नगर पालिकेची बचत होईल आणि त्या माध्यमातून अधिक विकासकामे करता येतील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

सभेच्या सुरुवातीला बांधकाम विभागासाठी सेवा तत्वावर १४ मजूर पुरवण्याच्या खर्चास मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी नगरसेवक योगेश पवार यांनी पावसाळ्यात बांधकाम विभागातील कर्मचारी नेमके काय काम करतात, असा प्रश्न उपस्थित केला. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर १४ ऐवजी केवळ १० मजूर मंजूर करण्याचा ठराव करण्यात आला.

बांधकाम विभागासाठी अभियंते निविदा प्रक्रियेद्वारे कमी दराने नियुक्त केले जातात; मात्र त्यांचा अनुभव तपासावा व मुलाखती घ्याव्यात, अशी सूचना फैसल कास्कर यांनी केली. तसेच मोठ्या विकास कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाच सदस्यांची समिती स्थापन करावी, अन्यथा मागीलवेळी ९७ लाख रुपयांचा अनावश्यक खर्च झाल्याची पुनरावृत्ती होऊ नये, असे त्यांनी सांगितले.

बांधकाम साहित्य पुरवठ्याच्या खर्चास मंजुरी देताना योगेश पवार यांनी पुन्हा काही त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. साहित्य पुरवठ्याची निविदा असताना त्याच ठेकेदाराकडून प्लास्टर व रंगकाम कसे करून घेतले, असा सवाल त्यांनी केला. यावर मुदतवाढ देताना केवळ साहित्य पुरवठ्याचेच काम करून घ्यावे, असा निर्णय घेण्यात आला. याचबरोबर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक नियुक्तीसही मंजुरी देण्यात आली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेतील तीन कामांसाठी अंदाजे ७५ लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली. तसेच भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनासाठी शेल्टर होम बांधण्यासाठी ८६ लाख ६१ हजार ९५० रुपयांच्या खर्चास, न्यायालयाच्या सूचनेनुसार, आर्थिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. या वेळी साजिद सरगुरोह यांनी गुरांसाठी कोंडवाडा उभारण्याची मागणी केली, तर गाढवांमुळे होणाऱ्या अपघातांकडे फैसल कास्कर व अन्य नगरसेवकांनी लक्ष वेधले.

जलतरण तलाव चालवण्यासाठी हरिओम फॅसिलिटी सर्व्हिसेस या ठेकेदारास आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासून हा ठेकेदार उत्तम सेवा देत असून ही नागरिकांसाठीची महत्त्वाची सुविधा आहे. त्यामुळे नव्याने निविदा काढण्यापेक्षा चांगले काम करणाऱ्यालाच पुढे संधी द्यावी, असे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले.

मटण मार्केट सुरू करण्यासाठी दुरुस्तीसाठी ७० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. तसेच भाजी मंडईतील गाळे लिलावासाठी प्रशासकीय व आर्थिक मंजुरी देण्यात आली. मटण मार्केट व भाजी मंडई सुरू झाल्यानंतर रस्त्यावर एकही भाजी, मटण किंवा चिकन विक्रेता दिसणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली.

या वेळी फैसल कास्कर व विकी लवेकर यांनी पवन तलाव मैदानावरील हेलिपॅड रद्द करून ते मैदान केवळ खेळासाठी राखून ठेवण्याची सूचना केली. याबाबत प्रांताधिकारी आकाश लिगाडे व बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. वाजे यांच्याशी चर्चा झाली असून पर्यायी जागा सुचविण्यास सांगितले आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली.

रामतीर्थ तलावासाठी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडून साडेतीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची, तसेच एक कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिल्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच व्ह्यू गॅलरीमध्ये खाऊगल्ली (चौपाटी) सुरू करण्याचे काम सुरू असून, जोपर्यंत व्यवस्था योग्य वाटत नाही, तोपर्यंत खाद्य विक्रेत्यांना तेथे परवानगी दिली जाणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

या सभेत उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, निहार कोवळे, सदा गोठे, कपिल शिर्के, शुभम पिसे, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी, प्रमोद बुरटे, उदय जुवळे, विकी नारळकर, फैसल कास्कर, अजय भालेकर, शिवसेना गटनेते अंकुश आवले, योगेश पवार, साजिद सरगुरोह, संदीप भिसे, अंजली कदम, रसिका देवळेकर यांच्यासह सर्व नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण चर्चा करत मते मांडली.

सभेला उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, सुजित जाधव तसेच सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!