WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा २८ फेब्रुवारीपासून शिमगोत्सव


श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचा २८ फेब्रुवारीपासून शिमगोत्सव

चिपळूण : संपूर्ण कोकणात शेरणे कार्यक्रमामुळे आणि गुलालमुक्त आदर्श शिमगोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेला, गोवळकोट-पेठमापवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या शिमगोत्सवास २८ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे.
शहरातील गोवळकोट येथील गोविंदगडाच्या पायथ्याशी व निसर्गाच्या सानिध्यात श्री देवी करंजेश्वरी व श्री देव सोमेश्वर देवस्थानचे मंदिर वसले आहे. आठव्या शतकातील हे देवस्थान असून पटवर्धन यांची कुळस्वामिनी आहे. या दिवसांचा शिमगोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने व शांततेत गुलाल विरहीत साजरा केला जातो. शेरणे कार्यक्रमामुळे या देवस्थानचा शिमगोत्सव संपूर्ण कोकणात प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उत्सवाला पुणे-मुंबईतील चाकरमान्यांसह अगदी परदेशी पाहुणेही आवर्जून भेट देतात.

यावर्षी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी केली आहे. गोवळकोट व पेठमाप भागात जागोजागी सजावट केली आहे. काही ठिकाणी देखावेही उभारण्यात आले आहेत. याशिवाय पेठमाप येथे वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर यात्रोत्सवाची तयारी देखील जोरदार सुरू झाली आहे. शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता या शिमगोत्सवास प्रारंभ होणार आहे. यावेळी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणाचा रोमहर्षक कार्यक्रम होणार असून त्यानंतर खऱ्या अर्थाने शिमगोत्सवास प्रारंभ होतो. या मंदिरापासून मशिदीपर्यंत पालखी मिरवणूक होणार आहे. यानिमित्त देऊळवाडी, सहाणवाडी, हरवडेवाडी येथील भाविकांच्या आरत्या स्वीकारत ही मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर मशिदभेटीचा अनोखा कार्यक्रम होणार आहे. चौघुले कुटुंबियांतर्फे मानाची आरती स्वीकारून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जपली जाणार आहे. त्यानंतर सहाणवाडी येथे होम लावून श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या दोन्ही पालख्यांचे गोविंदगडावर श्री देवी रेडजाई देवस्थानच्या भेटीसाठी प्रयाण होणार आहे. याठिकाणी मानकरी जगताप कुटुंबियांतर्फे पूजा झाल्यानंतर पालखीचे पेठमापच्या दिशेने प्रयाण होणार आहे. रात्री बाजारपुलाच्या ठिकाणी भैरी देवस्थानच्या भेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर व पेठमापवासीयांच्या आरत्या स्वीकारत दुसऱ्या दिवशी १ मार्च रोजी पहाटे होम लावून दोन्ही पालख्या पेठमाप येथील सहाणेवर विराजमान होणार आहेत. याठिकाणी देवीची ओटी भरण्याचा व रात्री करमणुकीचा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक २ मार्च रोजी दुपारी ३ वाजल्यापासून या शिमगोत्सवातील प्रसिद्ध शेरणे कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी या दोन्ही पालख्यांचे गोवळकोटच्या दिशेने प्रयाण होणार आहे.

३ मार्च रोजी पहाटे गोवळकोट सहाणवाडी येथे होम लावून तेथील सहाणेवर विराजमान होतील. येथेही देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीने पालख्या मंदिरात नेऊन शिमगोत्सवाची सांगता केली जाणार आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!