WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

प्रेरणा संस्थेची ३६ वी वार्षिक सत्यनारायण महापूजा उत्साहात


प्रेरणा संस्थेची ३६ वी वार्षिक सत्यनारायण महापूजा उत्साहात

मुंबई : चारकोप सेक्टर-१ येथील भूखंड क्रमांक १५६ वरील प्रेरणा संस्था (रजि.) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ३६ वी वार्षिक सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाली.


या धार्मिक सोहळ्यानिमित्त हळदी-कुंकू, महाप्रसाद तसेच कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री प्रवीण सावंत – झाली कृपा साईंची समूहाच्या सुमधुर व भक्तिरसपूर्ण भजनांनी कार्यक्रमास रंगत आणली.

या सोहळ्यात संस्थेतील बाळ-गोपाळ, महिला मंडळ तसेच रहिवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. संपूर्ण उत्सवकाळात प्रेरणा संस्था आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगली होती. संस्थेत सादर करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चारकोप परिसरात विशेष कौतुक होत आहे.

सध्याच्या काळात पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण वाढत असताना, युवा प्रेरणा मंडळ व प्रेरणा संस्था पूजा समिती यांच्या वतीने अभिजात मराठी संस्कृतीचा साधेपणा जपणारे आयोजन करण्यात आल्याने उपस्थितांचे मन भारावून गेले. दरवर्षी अशाच दर्जेदार व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री दत्तात्रय साईल, पूजा समिती प्रमुख श्री नितीन शिगवण तसेच युवा मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी केले.

यावेळी संस्थेतील श्री प्रशांत संभाजी जाधव यांनी सनदी लेखापाल (सी.ए.) परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तसेच कुमारी अद्विका अभिजित पालांडे हिने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके पटकावल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या बाळ-गोपाळ व महिलांचाही यथोचित गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दक्षता कवठणकर, माजी नगरसेवक व सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाचे सल्लागार श्री श्रीकांत कवठणकर, उत्तर मुंबई भाजपा सचिव श्री योगेश पडवळ, शिवसेना शाखाप्रमुख श्री निखिल गुढेकर, माजी वॉर्ड अध्यक्ष श्री प्रमोद गुजर, वॉर्ड अध्यक्ष श्री मनीष साळुंखे, प्रबोधनकार ठाकरे नगर युनियनचे अध्यक्ष श्री शशांक चौकीदार, समाजसेवक राजेंद्र (राजू मामा) खंकाळ यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. श्री संदीप गोसावी, श्री स्वप्नील शिंदे, सौ. प्रणाली राऊळ व सौ. स्नेहल निनाद पवार यांनी केले.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!