महामार्गावरील अंडरपास संदर्भातील वस्तुस्थिती नगराध्यक्षांनी माजी उपनगराध्यक्षांसमोर मांडली
चिपळूण : प्रांत कार्यालयाजवळील बौद्धवाडी आणि अतिथी हॉटेल समोर शिवाजीनगर येथे दोन अंडरपास उभारण्यात यावेत, अशी मागणी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वी केली होती. या मागणीसाठी त्यांनी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम तात्पुरते थांबवले होते. मात्र त्यानंतर काम पुन्हा सुरू झाल्याने “प्रशासन नगराध्यक्षांना जुमानत नाही का?” असा सवाल उपस्थित करत माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.
या पोस्टची दखल घेत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शुक्रवारी सकाळी माजी उपनगराध्यक्ष बापू काणे यांची भेट घेतली व संपूर्ण वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली. नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले की, पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, दोन अंडरपासच्या मागणीसाठी महामार्गाचे काम थांबवू नये. मे महिन्यापर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच अंडरपास व पुलासाठी महामार्गाच्या रचनेत आवश्यक असलेले किरकोळ बदल व त्यासाठी लागणारा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळेच महामार्गाचे काम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, असा खुलासा नगराध्यक्षांनी केला.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ हे प्रत्येक बाबतीत बारकाईने लक्ष देत असून, या बैठकीत महामार्गासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. पालकमंत्री उदय सामंत यांनी आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन त्यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत विषय नेऊ. मे महिन्यापर्यंत रस्ता सुरू व्हायलाच हवा आणि अंडरपास तसेच पुलासाठी लागणारा निधी शिष्टमंडळ नेऊन मंजूर करून आणण्याची जबाबदारी आपण घेतो, असे आश्वासन दिल्याचे नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले.
महामार्गाच्या विषयाबरोबरच अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीचा आढावा घेण्यात आला. पुढील आठवड्यात व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी नगराध्यक्षांसोबत बाजारपेठेत फिरून वाहतूक कोंडी व अन्य समस्यांची पाहणी करणार आहेत.
पाग पॉवर हाऊस येथे लवकरच गतिरोधकही बसवले जातील असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केलं. तसेच महामार्गावरील पावर हाऊस परिसरातून पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या मार्गावर खोल उतार असल्याने अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याचप्रमाणे गुहागर बायपास रोडवरील पिटीके हाइट्सपर्यंतचा उतार कमी करण्याची सूचना करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिले.
या बैठकीत महामार्गासह इतर नागरी प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.














