….त्यांनी मला फसवले, पक्षाचे उमेदवार माझ्यासोबत, अपक्ष लढणार – लियाकत शाह
चिपळूण – कॉंग्रेसमधून आपली नगराध्यक्षपदाची उमेदवारी निश्चीत झाली होती. मात्र जिल्हाध्यक्षांसह पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी माजी आमदार रमेश कदम यांच्या संगनमताने घात केल्याचा आरोप कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष लियाकत शाह यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला. तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी नगराध्यक्षपदाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी एकाचवेळी सुधीर शिंदे व लियाकत शाह यांना एबी फ़ॉर्म दिल्याने गोंधळ झाला. त्यानंतर सुधीर शिंदे यांच्यावर माघार घेण्याचे प्रयत्न केले. मात्र शिंदे यांनी माघार न घेतल्याने लियाकत शाह यांची कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर असलेली उमेदवारी बाद झाली. या घडामोडीमुळे कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यातून नाराज झालेल्या शाह यांनी बंडाचा मार्ग स्विकारला असून तडकाफडकी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा देत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांच्या या उेदवारीला कॉंग्रेसच्या अधिकृत १० नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी पाठींबा दिला. यामध्ये इम्तियाज कडू, अजित शिंदे, मिस्बाह नाखूदा, संदीप आग्रे, किशोर जागुष्टे, त्रिशा घाडगे, विणा जावकर, सफा गोठे, स्वाती दांडेकर, निर्मला जाधव आदि उमेदवारांचा समावेश आहे.
लियाकत शाह म्हणाले, महाविकास आघाडी होण्यासाठी कॉंग्रेसचे सुरवातीपासून प्रयत्न होते. मात्र एैनवेळी माजी आमदार रमेश कदम यांनी आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून स्वतःचे नाव जाहीर केले. लोकसभा व विधानसभा निवडणूकीनंतर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर कॉंग्रेसचा अधिकार असताना तो डावलण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी आपल्या नावाची निवड केली होती. त्यानुसार उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. मात्र त्यात काही तांत्रिक चुका घडल्याने दुसऱ्यांदा अर्ज भरण्यात आला. त्यामध्ये मुख्य उमेदवार म्हणून शिंदे सेनेतून आलेल्या सुधीर शिंदे यांचे नाव घुसवण्यात आले. तर जाणीवपुर्वक पर्यायी उमेदवार म्हणून आपले नाव सुचवले. यामागे पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग, सुरेश कातकर, रमेश कीर या मंडळीचा हात असून माजी आमदार रमेश कदम यांच्या संगमनमतानेच हे घडले आहे. तरिही आपण अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढणार आहोत. लियाकत शाह यांचे आरोप
जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी फेटाळून लावले. शाह यांचा अर्ज चुकला होता, शिंदे यांचा उमेदवारी अर्ज नसता तर काँग्रेस चा अधिकृत उमेदवार राहिला नसता असे त्यांनी सांगितले.












