*गरज आहे गावागावातील ‘कांतारा’ वाचवण्याची* :.
सध्या कांतारा चित्रपटाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कांतारा केवळ एक चित्रपट नसून जगाला दिलेला एक संदेश होय, जसे ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षाच्या तरुणीने २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रसभेच्या भाषणातून संपूर्ण जगाला संदेश दिला होता. पृथ्वीचे आयुष्य केवळ २०५० पर्यतच आहे. ग्रेटा हिने ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर ‘नावाची पर्यावरण चळवळ उभी केली आणि त्यातून सर्व देशांच्या पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष यांना हवामान बदलाचे परिणाम व त्यावर तत्काळ कृती करण्यास ठणकावून संदेश दिला तोच संदेश आज ‘कांतारा’ प्रत्येक भारतीयांना किंबहूना जगातील प्रत्येकाला देवू पाहतोय.
“कांतारा” म्हणजे दैवभूमी, अर्थात वनराई, देवराई होय. आपल्या पूर्वजांना कदाचित भविष्य ओळखण्याची क्षमता होती म्हणूनच कि काय त्यांनी गावागावात वनराई, देवराई गायरान यांची निर्मिती केली होती. किमान देवाच्या भितीने तरी आपले वंशज जंगले नष्ट करणार नाहीत हा दूरदृष्टीकोन आपल्या पूर्वजांकडे होता त्यातूनच वनदेव, नागदेव, वाघदेव, देवचार गवळदेव, डुंगोबा, गिरोबा असे ‘देव’ त्यांनी जंगलात निर्माण केले . जंगलातले एखादे पान जरी तोडले तरी वनदेव शिक्षा देतो ही त्यांची समजूत होती म्हणून त्याकाळी लोकांनी हजारो जंगले निर्माण केली, जगवली व वाढवली सुध्दा . तेथील जीवनचक्रात अनेक अनेक प्राणी, पक्षी किटक व माणूस हजारो वर्षे टिकून राहिला. कालौघात मनुष्याने चंद्र तारे गाठले मात्र स्वतः ची माती आणि निसर्गसंपत्ती मात्र विसरला आणि सुरुवात झाली विनाश पर्वाची.
१५ वर्षाच्या ग्रेटाने जगातील नेत्यांकडे भविष्यातील जन्म घेणाऱ्या मुलांच्यासाठी जीवनदान व पृथ्वी सुरक्षित ठेवण्याची मागणी केली . ती म्हणते २०५० नंतर पृथ्वीचा विनाश अटळ आहे. हिमनग वेगाने वितळत आहेत, जंगले नष्ट होत आहेत, ऋतुचक्र बिघडले आहे. वैश्विक तापमान वाढले आहे. २०५० पर्यंत अर्धी मुंबई पाण्यात असेल. पुढच्या पिढीला जगायला पृथ्वीच नसेल.आम्हाला, जगायचंय, जगू द्या .” ही तिची आर्त हाक जगाला धोक्याची घंटा म्हणावी लागेल .
त्यामुळे पृथ्वी व पर्यायाने पुढची पिढी सुरक्षित जगायची असेल तर गावागावातील कांतारा आज जपण्याची नितांत गरज आहे . तब्बल २००० वर्षापासून भारतीय परंपरेनी जपलेली ही जंगले नष्ट झाली आणि सुरु झाला प्रचंड महाप्रलय, त्सुनामी, हिमस्खलन व परवा परवा तर विदर्भ, मराठवाड्यात, पंजाब, बिहार , हैदराबाद येथे झालेला प्रंचड जलप्रपात, २०१९ साली आलेली कोविड सारखी महामारी या साऱ्यांचे मूळ आहे ते मानवी वर्तनात. सध्याच्या माणसांची वाढलेली हाव. पाणी, जमीन आणि हवा ही माझीच नव्हे तर माझ्या बाबाची संपत्ती अशा गोड गैरसमजातून निसर्गावर माणसांचे झालेले अतिक्रमण, का व कुठे थांबायचे याचा माणसाला पडलेला विसर आणि मी जगलो कीं झाले पुढच्यांचे काही का होईना ? माणसांची ही भावना येथून पुढच्या जगण्याला, जीवनाला आणि भावीपिढीला व पृथ्वीला क्षणार्धात नामशेष करणारी ठरू शकते.
*वेळीच ऐका, सावध हाका* याप्रमाणे प्रत्येकाने रिषभ शेट्टी, ग्रेटा थनबर्ग, कर्नाटकातील हजारो वृक्ष मुलांप्रमाणे वाढवणारी सालुमारदा थिमक्का, सुंदरलाल बहुगुणा , तेलंगणा येथे ज्यांनी १ कोटी वृक्ष लावले व समाजाने ज्यांना वनजीवी ही बिरुदावली बहाल केली त्या दोदूरीपल्ली रम्मया, आसाम येथील ब्रम्हपुत्रा रक्षक ज्यांनी ब्रम्हपुत्रेच्या तीरावर हजारो वृक्ष लावले, जगवले ते ‘मोलाई” पायेंग यांच्याप्रमाणे निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने जगले आणि आयुष्यभर झटले पाहिजेत तर आपली पुढची पिढी पृथ्वी पाहू शकणार आहे.
या साऱ्यांचा वसा आणि वारसा जपत कोल्हापूर जिल्हयातील आजऱ्यासारखा खेड्यात ‘संवेदना’ नावाची टीम तयार होते. कोणी इंजिनियर, तर कोणी डॉक्टर तर कोण फौजी तर कुणातरी सामान्य शेतकरी सारेच एकत्र येतात आणि हारूर गावच्या उजाड माळरानावर स्वतःचा कांतारा, देवराकाडू, देवराई अर्थात वनराई उभी करतात. एवढ्यावरच न थांबता गावागावात ही वनराई निर्माण करण्यासाठी कष्टतात त्यातूनच सुळे, नेसरी अशा ठिकाणीही अशी वनं उभी करण्यात ते यशस्वीही ठरतात. बटकणंगले या छोट्याशा गावातही गेली दोन पाणी फौंडेशनचे ध्येयवेडे तरुण पर्यावरणासाठी झटताहेत. खरा कांतारा चित्रपटात पहाण्याऐवजी अशा नवयुवकांच्या प्रयत्नात , समर्पणात आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या पृथ्वीबद्दलच्या उत्तरदायित्वात पहायला हवा. चित्रपट माणसाला जगवू शकत नाही तर झाडं, प्राणी परंपरा व संस्कृती आणि संस्कृती जपणारा वेडा रानमाणूस चित्रपटांना जगवतो आहे . .
तो वेडा कोकणी रानमाणूस लढतोय हे निसर्गचक वाचवण्यासाठी अर्थातच तो रानमाणूस म्हणजेच कोकणातील प्रसाद गावडे. असेच साताऱ्यातील एकटा रमेश खरमाळे नावाचा देशरक्षक सैनिक हा वनरक्षक बनतो आणि शेकडो झाडे लावतो व जगवतो. या साऱ्यावरुन एक लक्षात येतं,
*सारेच कुठे बिघडते आहे,* *अजूनही चांगले घडते आहे* .! याप्रमाणे हे दीपस्तंभ व त्यांचा आदर्श, या आदर्शांच्या चांगल्याच्या व चांगुलपणाचा ध्यास पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने धरल्यास पृथ्वीचा ऱ्हास टळेल यात शंका नाही. पण कांताराने पुन्हा एकदा संदेश दिला आहे तुमचा वाटा हवा तेवढाच घ्या, बाकीचा निसर्गाकडेच ठेवा. हे सगळे कोठून आले हे प्रत्येकाला समजले तरी जीवन सरळ व सोपे होईल. कांतारा, वनराई, देवराई ही चळवळ बनली पाहिजे अर्थात चळवळ जंगलाबरोबर संस्कृती जपण्याची. गावगाडा हरवत चाललाय म्हणून तो चित्रपटात पहायला लोकांना आवडतो आहे खरा कांतारा निसर्गात आहे. निसर्गात चला, निसर्ग जगवा त्याला वाढवा, तोच तुम्हाला जगवेल. हा संदेश घराघरात, शाळाशाळांत आणि देशादेशात पोहचवणे हे कर्तव्य मानत प्रत्येकाने स्वतः कृती केल्यास पृथ्वी ‘सुजलाम सुफलाम’ होईल आणि भविष्यात जन्माला येणाऱ्या लाखो ग्रेटा जीवनाची भिती न बाळगता निर्भय पणे जगतील…. कारण कांताराला देणे एवढंच माहिती आहे … मग ते धान्य असो , फळे असो कि जीवन …. आता प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारायला हवा, कीं आपण पृथ्वीचा नाश करतोय कि येणाऱ्या आपल्या पिढयान, पिढयांचा नाश करतोय? याचं उत्तर नकारार्थी येईपर्यंत प्रत्येकाने विचार व कृती केल्यास पृथ्वी खऱ्या अर्थानं दैवभूमी बनेल.
श्री महेश धोंडीबा घुगरे.
प्रा शिक्षक.
9657693852
गडहिंग्लज













