WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रेस्क्यूचा थरार : बिबट्याची विहिरीतून सुटका


रेस्क्यूचा थरार : बिबट्याची विहिरीतून सुटका

रत्नागिरी : मौजे मजगाव (ता. व जि. रत्नागिरी) येथील श्री. अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या आंबा कलम बागेतील विहिरीत एक बिबट्या पडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सकाळी सुमारे 9.30 वाजता मजगाव गावचे पोलिस पाटील अशोक केळकर यांनी ही माहिती वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांना तात्काळ कळवण्यात आले आणि रेस्क्यू टीम, पिंजरा व आवश्यक साहित्यांसह वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

सदर विहीर ही आयताकृती असून अंदाजे 15 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 25 फूट खोल आहे. विहिरीतील पाण्याची पातळी 7 ते 8 फूट होती. बिबट्या विहिरीतील दगडावर बसलेला दिसून आला. तात्काळ विहिरीच्या सभोवती जाळी टाकून परिसर बंदिस्त करण्यात आला आणि दोऱ्यांच्या साहाय्याने पिंजरा सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. फक्त पंधरा मिनिटांतच बिबट्या सुरक्षितपणे पिंजऱ्यात पकडण्यात आला.

यानंतर मा. पशुधन विकास अधिकारी मालगुंड श्री. स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. बिबट्या सुरक्षित असून तो नर जातीचा व अंदाजे 6 ते 7 वर्षांचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले की, विहिरीवर शेडनेट टाकलेले असल्याने बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करताना चुकून विहिरीत पडला असावा.

ही रेस्क्यू कारवाई विभागीय वनाधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत परिक्षेत्र वनाधिकारी प्रकाश सुतार, वनपाल न्हानू गावडे (पाली), सारीक फकीर (लांजा), वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम, तसेच प्राणीमित्र शाहीद तांबोळी, ऋषिकेश जोशी, महेश धोत्रे आणि पोलीस अधिकारी भगवान पाटील, राजेंद्र सावंत, शरद कांबळे, रामदास कांबळे, ग्रामपंचायत प्रतिनिधी फैय्याज मुकादम, तंटामुक्ती अध्यक्ष बरकद मुकादम, पोलीस पाटील अशोक केळकर आणि गावातील ग्रामस्थांनी सहकार्य केले.

वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि सांगितले की, बिबट्या पूर्णपणे सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.

तसेच, अशा प्रकारच्या वन्यप्राणी अडचणींच्या घटनांबाबत नागरिकांनी वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.


620
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!