WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळुणात शिवसेना उबाठाला मोठा धक्का


चिपळुणात शिवसेना उबाठाला मोठा धक्का

युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळेंचा पक्ष व पदाचा राजीनामा

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेची निवडणूक संपताच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या युवती शहर संघटक डॉ. सानिका टाकळे यांनी आपल्या पदासह पक्षाचाही राजीनामा देत उबाठाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. पक्षातील स्थानिक कार्यपद्धती घातक, अन्यायकारक आणि क्लेशदायक असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात केला आहे.
डॉ. सानिका टाकळे यांनी स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे की, “कार्यकर्त्यांना पुढे ढकलून वाऱ्यावर सोडायचे आणि नेत्यांसाठी मात्र मरीमर मरायचे, ही पद्धत पक्ष आणि कार्यकर्त्यांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे.” एक उच्चशिक्षित युवती पदाधिकारी म्हणून ही कार्यसंस्कृती आपल्याला मान्य नसल्याने टोकाचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत उबाठाची गटबाजी उघड
चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत उबाठामध्ये थेट दोन गट पडल्याचे चित्र समोर आले. एक गट शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आघाडीत सहभागी झाला, तर दुसऱ्या गटाने माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र निवडणूक लढवली. या गटबाजीमुळे पक्षाची ताकद विभागली गेली आणि निवडणुकीत उबाठाला अक्षरशः पानिपत पाहावे लागले.

पराभवानंतर राजीनामा, पण जळजळीत शब्दांत खंत
डॉ. सानिका टाकळे या उबाठाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवत होत्या. पराभव स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ पक्षाकडे राजीनामा सादर केला. मात्र हा राजीनामा केवळ औपचारिक नसून पक्षाला आरसा दाखवणारा ठरला आहे. टाकळे कुटुंब हे चिपळूणातील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाते. “आम्हाला स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला. त्यांच्या शिकवणुकीनुसार आम्ही आजतागायत पक्षासाठी काम करत राहिलो,” असे त्यांनी नमूद केले आहे. स्वतःच्या उद्योग-व्यवसायाकडे दुर्लक्ष करून अहोरात्र पक्षासाठी काम केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

वडिलांच्या राजकीय आयुष्याचाही दाखला
राजीनामा देताना डॉ. टाकळे यांनी आपल्या वडील समीर टाकळे यांच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. “माझ्या वडिलांनीही पक्षासाठी आपले उभे आयुष्य वेचले, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून दिवसरात्र काम केले. मात्र त्यांचे राजकीय आयुष्यही बरबाद झाले. जर कार्यकर्त्यांचे असेच होणार असेल, तर पक्षात राहून काम तरी कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

उबाठासाठी आत्मचिंतनाची वेळ
निवडणूक संपताच युवती शहर संघटकाने दिलेला हा राजीनामा उबाठासाठी मोठा धक्का मानला जात आहे. चिपळुणातील अत्यंत निष्ठावंत आणि कडवट मानल्या जाणाऱ्या टाकळे कुटुंबातून राजीनाम्याची सुरुवात झाल्याने पक्षासाठी ही गंभीर आत्मचिंतनाची बाब ठरली आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी, कार्यकर्त्यांची उपेक्षा आणि नेतृत्वाची भूमिका यावर उबाठा पक्ष काय भूमिका घेतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!