चिपळूणात शिवसेना भाजपची युती
राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर, शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांचे स्टेटस झळकले
चिपळूण – चिपळूण पालिकेच्या निवडणूकीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार मिलींद कापडी यांनी अखेर माघार घेतली. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भाजपने युती केल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी स्पष्ट केले. परिणामी महायुतीतून राष्ट्रवादी एकाकी राहिली असून त्याचे कितपत पडसाद उमटतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागलेले आहे.
शुक्रवारी 21 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने महाविकास आघाडीतही घडामोडी सुरू आहेत. महाविकास आघाडीतर्फे ३ उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. त्यापैकी ठाकरे शिवसेनेचे राजेश देवळेकर, कॉंग्रेसचे सुधीर शिंदे, लियाकत शहा यापैकी कोण माघार घेणार की आघाडीचे उमेदवार माजी आमदार रमेश कदम रिंगणात राहणार हे समोर येणार आहे. चिपळूणात नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १४१ अर्ज दाखल झाले आहेत. महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने प्रभाग ९ आणि १० मधील दोन जागा मागितल्या होत्या. मात्र तेथे भाजपने उमेदवारी दाखल केली आहे. आता नगराध्यक्षपदासाठी मिलींद कापडी यांनी माघार घेत प्रभाग ९ व १० मधील जागांचा निर्णय राष्ट्रवादीने भाजप व शिंदे सेनेच्या कोर्टात टाकला होता. मात्र शिंदेसेना आणि भाजपने युती करत राष्ट्रवादीला धक्का दिला. जिते राष्ट्रवादीचे उमेदवार नाहीत तेथे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
महायुतीमधील शिंदे शिवसेनेचे उमेश सकपाळ, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून मिलींद कापडी यांचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. पालकमंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीने महायुतीसाठी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. तर प्रभाग ११ अ मधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अमृता विलास कोंडविलकर यांनीही अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या शर्ययतीत ७ उमेदवार राहिले आहेत. उद्या दुपारी ३ पर्यत आणखी कोण माघारी घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
Views: 1,041











