राष्ट्रवादीविना भाजप आणि शिवसेनेची मुंबईत बैठक
चिपळूण नगराध्यक्षपदाचा तिढा कायम
चिपळूण : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी
शिंदेसेना व भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून सातत्याने महायुतीचा नारा दिला जातोय. मात्र राष्ट्रवादीच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात शुक्रवारी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी भाजप आणि शिवसेनेची बैठक झाली. या बैठकीत देखील महायुतीचा नारा देण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही नेता व पदाधिकारी उपस्थित नसल्याने राष्ट्रवादीला डावलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.
दोनच दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातील असे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील तसे बोलून दाखवले होते. मात्र, शुक्रवारी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला महायुतीचे केवळ शिंदेसेना व भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) या पक्षाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते. याबाबत राजकीय वर्तुळात उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील बैठकी विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसला निमंत्रण नव्हते. त्यामुळे कोणी पदाधिकारी तेथे उपस्थित राहिले नाहीत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस कडून देण्यात आले.
या बैठकीत जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणूक नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेष म्हणजे चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या जागा वाटपासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शिंदेसेनेसाठी पालकमंत्री उदय सामंत आग्रही राहिले असल्याचे समजते. यामुळे ही जागा नेमकी कोणाच्या पारड्यात जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीला गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार डॉ. विनय नातू , सुर्यकांत दळवी, सदानंद चव्हाण, सुभाष बने, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, भाजप शहराध्यक्ष शशिकांत मोदी आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.












