WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘सह्याद्री’ला सावरणारे ‘दादा’ गेले आणि आम्ही पोरके झालो!


‘सह्याद्री’ला सावरणारे ‘दादा’ गेले आणि आम्ही पोरके झालो!

आ. शेखर निकम भावुक, सावर्डेत वाहिली आदरांजली

चिपळूण : आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. आयुष्यात असा दिवस येईल असं कधीच वाटले नव्हते. मला राजकीय कारकिर्दीची मुळीच चिंता नाही, मी त्याचा विचारही करत नाही, मात्र स्व. गोविंदराव निकम यांच्या नंतर आम्हाला आणि सह्याद्रीला कुणी सावरले असेल तर ते अजितदादा होते, मात्र तेच आज आपल्यातून निघून गेले आणि आम्हीही पोरके झालो, अशी भावना व्यक्त करत आ. शेखर निकम यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

एक आठवण….

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचा बारामती येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. सकाळी निधनाचे वृत्त समजताच आ. शेखर निकम यांनी तातडीने बारामती येथे धाव घेतली. शुक्रवारी रात्री उशिरा सावर्डे येथे दाखल झाले. शुक्रवारी सकाळी सावर्डे येथे शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

आ. शेखर निकम म्हणाले की, आयुष्यातील हे दोन दिवस माझ्यासाठी काळे दिवस ठरले, असे दिवस येतील असे कधीच वाटले नव्हते. स्व. निकम साहेबांचे निधन झाले त्या दिवशी दादा इथे सावर्डे मध्ये होते. निकम साहेब गेल्यानंतर आम्हाला आणि सह्याद्री परिवाराला दादांनी सावरले. आज आम्ही खऱ्या अर्थाने पोरके झालो आहोत. सर्व आमदारांना आपण पोरके झाल्याचे वाटत आहे.
दादा आणि माझे 2000 सालापासून जवळचे नाते होते. यातून भावनिक सबंध कधी जुळले हे कळलेच नाही. मोठ्या भावासारखे त्यांनी मला सांभाळले. हक्काने मागावे आणि त्यांनी द्यावे असे नाते तयार झाले होते. दादांनी चिपळूणसाठी भरपूर असा निधी दिला. कसबामध्ये जागतिक पातळीवरचे छ. संभाजी महाराज स्मारक उभे करण्याचा ध्यास घेऊन काम सुरू केले होते. त्याच बरोबर मार्लेश्वरचा विकास ही वेगळ्या धर्तीवर करण्याचा दादाचे स्वप्न होते. जे-जे देता येईल ते-ते दादांनी दिले आहे असे आ. निकम यांनी सांगितले

दादांविषयी काय काय सांगू असे म्हणत आ. निकम यांचा कंठ दाटून आला. त्यांची ही स्थिती बघून शोकसभेला उपस्थित असणारे शेकडो कार्यकर्तेही गहिवरले होते.

सावर्डे येथे झालेल्या शोकसभेला जिल्हा मध्यवर्ती बँकचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजेंद्र महाडिक, विजयराव गुजर, तालुकाध्यक्ष नितीन (अबू) ठसाळे, दशरथ दाभोलकर, जयंद्रथ खताते, दिशा दाभोलकर, दिलीप माटे, मिलिंद कापडी आदी मान्यवरांसह, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!