WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

उन्हाचा पारा चढला : प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना


उन्हाचा पारा चढला : प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना

रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा सातत्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘उष्माघात’ टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.व्ही.जगताप यांनी केले आहे.

उन्हाळ्यात प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अतिसार, उलट्या, चक्कर येणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे, डोकेदुखी किंवा अस्वस्थता, त्वचेला खाज येणे किंवा घामोळ्या होणे यासांरख्या समस्या जाणवू शकतात. उष्माघात हा अत्यंत गंभीर प्रकार असून यात शरीराचे तापमान अचानक वाढते आणि रुग्ण बेशुद्ध पडू शकतो.

उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे, तहान लागलेली नसली तरीही दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिणे, घराबाहेर पडताना डोक्याला टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करणे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरणे, लिंबू सरबत, ताक, लस्सी, ओआरएस, नारळ पाणी आणि घरगुती नैसर्गिक पेयांचे सेवन करणे, हलके, सुती आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, आहारात काकडी, टरबूज, द्राक्षे यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करणे यांसारखे कृती करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुचविले आहे.

दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळणे, मद्यपान, चहा, कॉफी आणि जास्त साखर असलेल्या पेयांचे सेवन टाळणे, शिळे किंवा उघड्यावरचे पदार्थ खाण्याचे टाळणे, कडक उन्हात कष्टाची किंवा व्यायामाची कामे करणे टाळणे या गोष्टी करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जर एखाद्या व्यक्तीला उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली किंवा बेशुद्ध पडल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी न्यावे, त्याच्या अंगावरील कपडे सैल करावेत, थंड पाण्याने शरीर पुसून काढावे, रुग्ण शुद्धीवर असल्यास त्याला पाणी किंवा ओआरएस द्यावे, तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे. लहान मुले, गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उष्णतेच्या लाटेत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. काहीही त्रास जाणवल्यास घरगुती उपाय करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!