पुरोगामी शिक्षक संघटनेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
राजापूर (पाचल): रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी उपयुक्त ठरणारी दिनदर्शिका गेली १७ वर्षे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने मोफत स्वरूपात वितरित केली जात आहे. याच परंपरेला अनुसरून महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा राजापूर तालुक्यातील पाचल येथे उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत पाचल येथील आबा नारकर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमास पाचल ग्रामपंचायत सदस्य बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे, राजापूरचे गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, जुनी पेन्शन संघटनेचे विशाल घोलप, आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पाडवी, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विश्वनाथ डवरी, शिक्षक समितीचे अनाजी मासये, ९७ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सखाराम राजाराम साळवी, ९४ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक, लेखक व रंगकर्मी रंगनाथ दामोदर सप्रे, पत्रकार सुरेश गुढेकर, वसंत प्रभुदेसाई, आत्माराम पाटकर, पेन्शनर संघटनेचे तालुका सरचिटणीस प्रदीप कुलकर्णी तसेच पुरोगामी संघटनेचे राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक प्रकाशन झाले. यावेळी ९७ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सखाराम साळवी यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या या उपक्रमाचे कौतुक करत दोन हजार रुपयांची देणगी संघटनेस प्रदान केली.
या कार्यक्रमास पाचल परिसरातील मोठ्या संख्येने तरुण शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा सल्लागार व पेन्शनर संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश साळवी, प्रकाश पाध्ये व विनायक खानविलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत गौरवोद्गार काढले. तसेच राजापूर तालुक्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष यशवंत पेढांबकर, शिक्षक पतपेढी तज्ज्ञ संचालक शशिकांत सकपाळ आणि दैनिक सूर्योदयचे उपसंपादक व जिल्हा नेते प्रदीप पवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिपळूण तालुकाध्यक्ष शशिकांत सकपाळ यांनी केले. प्रास्ताविक राज्यकार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन विनायक खानविलकर यांनी केले. कार्यक्रमास राजापूर, लांजा, खेड व चिपळूण तालुक्यातील संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











