WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘तो’ सावकार येणार गोत्यात


 

‘तो’ सावकार येणार गोत्यात

सात पीडित कर्जदारांच्या तक्रारी; चौकशी सुरू

चिपळूण : भाजप पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक पुढाकारामुळे चिपळुणात सध्या ‘सावकारी’चा विषय चांगलाच गाजतो आहे. ज्या सावकारविरोधात बेधडक आवाज उठवून आर्थिक पिळवणूक झालेल्यांच्या वेदनांना वाचा फुटली त्या प्रकरणाची व्याप्तीही हळूहळू वाढू लागल्याचे समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत तब्बल सात पीडित कर्जदारांनी ‘त्या’ सावकाराविरोधात थेट तक्रारी दिल्याची माहिती सावकारांचे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. या तक्रारींची सखोल चौकशी सुरु झाली आहे. त्यामुळे कर्जदारांकडून ‘अव्वाच्या सव्वा’ व्याज वसूल करणारा ‘तो’ सावकार गोत्यात येण्याची दाट शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सावकारी व्यवसाय सुरू आहे. सध्या 13 जणांकडे सावकारी व्यवसायाचा परवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमानुसार परवानाधारक सावकारांनी वार्षिक 18 टक्के व्याजदर आकारणे अपेक्षित आहे. मात्र काही सावकारांकडून तब्बल 30 ते 35 टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

कर्ज देतेवेळी काही सावकारांकडून रेशनकार्ड, दागिने तसेच दुचाकी-चारचाकी, गाड्यांचे आरसीबुक, घर -फ्लॅटचे कागदपत्र ताब्यात ठेवून दबाव टाकला जात असल्याचेही समोर आले आहे. एवढेच नव्हे तर कर्जदाराला शिवीगाळ, अरेरावीची, धमकावण्याची भाषाही वापरली जाते, असे बोलले जात आहे.

दरम्यान, चिपळुणातील एका सावकाराकडून होत असलेल्या आर्थिक पिळवणूक व त्रासाला कंटाळून काही कर्जदारांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व तालुकाध्यक्ष विनोद भुरण यांची भेट घेऊन सर्व हकीकत कानावर घातली. आपल्यावर होत असलेल्या फसवणुकीची माहिती दिली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित पीडित कर्जदारांना घेऊन शहरातील परकार कॉम्प्लेक्स येथील सावकारांचे सहाय्यक निबंधक अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले होते. आक्रमक झालेल्या पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सावकारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याच दरम्यान, ज्या कर्जदारांची खाजगी सावकारांकडून आर्थिक पिळवणूक केली जात आहे त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. मोरे व श्री. भुरण यांनी केले होते. या आवाहनालाही आता वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. आतापर्यंत संबंधित सावकाराविरोधात सात तक्रारी दाखल झाल्या असून या सावकाराच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या मागणीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी तक्रारदारांना रितसर तक्रार नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्याकडून या तक्रारीसंदर्भात प्रतिज्ञापत्रही घेतले जाणार आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!