‘लक्ष्मी ऑर्गेनिक’ला कायदे, नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना
रत्नागिरी पोलीस दलाकडून बैठक,
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी : लोटे एम.आय.डी.सी., खेड (जि. रत्नागिरी) येथे कार्यरत असलेल्या “लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज लिमिटेड” या कंपनीबाबत सोशल मीडियावर काही पोस्ट्स व व्हिडिओ प्रसारित होत असून, त्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस दलाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. कंपनीविषयी प्राथमिक माहिती घेण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दि. 23 डिसेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस कंपनीच्या वतीने प्लांट हेड दीपक पाटील उपस्थित होते. बैठकीदरम्यान सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या जनतेच्या चिंता, आवश्यक कायदेशीर प्रक्रिया, वैधानिक परवानग्यांचे पालन तसेच नागरिकांशी पारदर्शक संवाद ठेवण्याचे महत्त्व यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने कंपनीच्या प्रतिनिधींना सर्व लागू कायदे, पर्यावरणीय नियम तसेच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या अस्पष्ट माहिती अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच त्या पुढे प्रसारित करू नयेत. कोणतीही शंका असल्यास शासकीय यंत्रणांशी संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य करावे.











