लोकसहभागातून साकारलेल्या देवराईचे उद्या उदघाटन
कळंबस्तेत २७० प्रकारची १३०० झाडांची लागवड, प्रत्येक झाडाला क्युआरकोड, प्रांताधिकाऱ्यांचा पुढाकार
चिपळूण : चिपळूणच्या वैभवात भर घालणारी कळंबस्ते येथील देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डन बहरू लागली आहे. तालुक्यात प्रथमच लोकसहभागातून साकारलेल्या या देवराईचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता उदघाटन होणार आहे. या देवराईत तब्बल २७० हून अधिक विविध जातीची झाडे येथे लावण्यात आली आहेत.
कोकणातील देवराईचे कालानुरुप अस्तित्त्व कमी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी व दुर्मीळ होत चाललेली वृक्षसंपदा आणि देवराईचे अस्तित्त्व पुन्हा निर्माण करण्याकरिता प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेतला. प्रांताधिकाऱ्यांनी पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, शाळा आणि महाविद्यालये, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून कळंबस्ते येथे रेल्वे फाटकाजवळ साडेतीन एकर जागेत देवराई अंतर्गत बोटॅनिकल गार्डन उभारली. गेली अनेक वर्षे ही जागा पडीक होती. मात्र देवराईच्या गार्डनमुळे येथील परिसर बहरून गेला आहे. लोकसहभागातून येथे सातत्याने काम सुरू असते. शासकीय कामकाजा व्यक्तीरिक्त एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून प्रांताधिकारी आकाश लिगाडे समाजातील विविध घटक आणि संस्थाना सोबत घेऊन देवराई बहरण्यासाठी मेहनत घेत आहेत. या देवराईत देशी प्रजातीची २७० हून अधिक झाडे लावली आहेत. विद्यार्थ्यांना त्याचा शास्त्रोक्त अभ्यास करता यावा, यासाठी प्रत्येक झाडाला क्युआर कोड लावला आहे. सर्व झाडांना ठिंबक सिंचन द्वारे पाणी दिले जाते. साडेतीन एकर परिसरास संरक्षक जाळी घालण्यात आल्याने मोकाट जनावरांचा त्रास कमी झाला. विद्युत प्रकाशासाठी या परिसरात सोलार सिस्टीम उभारली आहे. गार्डनची पाहणी करण्याची पक्क्या पायवाटा बांधल्या आहेत. सात महिन्यापुर्वी सुमारे १३०० रोपे लावण्यात आली होती. पाच सहा महिन्यात ६०० ते ७०० रोपे नष्ट झाली. पुन्हा त्याच जातीची तेवढीच रोपे, रत्नागिरी, पुणे आदी विविध ठिकाणीहून आणत त्याची लागवड करण्यात आली. अनेकांनी याकामी योगदान दिल्याने येथे अनेक प्रकारची दुर्मीळ चाललेल्या फुलांचे बोटॅनिकल गार्डन नागरिकांसाठी खुले होणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता उदघाटन कार्यक्रमास आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी नागरिकांनी, निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी उपस्थिती रहावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे, सह्याद्री निसर्ग मित्र चे भाऊ काटदरे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी केले आहे.













