चिपळूण येथील जेसीबी व्यावसायिक संकटात
परराज्यातील यंत्रसामग्रीमुळे स्थानिकांना आर्थिक फटका
चिपळूण : परराज्यातील यंत्रसामग्रीमुळे चिपळूण तालुक्यातील स्थानिक जेसीबी व्यावसायिक गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या संदर्भात चिपळूण तालुका जेसीबी संघटनेने माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
स्थानिक जेसीबी व्यावसायिकांनी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर चिपळूण शहरात व परिसरात परराज्यातील जेसीबी यंत्रसामग्री मोठ्या प्रमाणावर येऊन स्थानिक बाजारपेठेत स्पर्धा निर्माण करत आहेत.
कोकणातील कामाचा कालावधी मर्यादित म्हणजेच पावसाळा वगळता केवळ आठ महिने असल्याने या बाहेरील जेसीबींमुळे स्थानिक व्यावसायिकांना रेट कमी करावा लागतो आणि आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
आरटीओकडून या बाहेरील जेसीबींना अप्रत्यक्ष सहकार्य मिळत असल्याने स्थानिक व्यावसायिकांचे काम कमी होत चालले आहे. त्यामुळे अनेकांना स्वतःच्या जेसीबीचे पासिंग, विमा आदी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे कठीण झाले आहे.
अशा व्यावसायिकांना काही काळाची मुदत देऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच काही स्थानिक जेसीबीवर महसूल विभाग व पोलिसांकडून किरकोळ कारवाई झाल्याची नोंद निवेदनात करण्यात आली असून, त्या कारवाया रद्द करण्यात याव्यात व पुढील काळात तपास करूनच कारवाई व्हावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
या वेळी सुबोध सावंत देसाई, मनोजशेठ भोजने, रामशेठ नलावडे, विक्रांत पवार, रामशेठ नार्वेकर, विनोद भुरण, प्रकाश पवार, ऋषिकेश नलावडे, गणेश ओतारी, मयूर खेतले, शशिकांत साळवी, महेंद्र कुऱ्हाडे, लक्ष्मण कदम आदी जेसीबी व्यावसायिक उपस्थित होते.
स्थानिक जेसीबी व्यावसायिकांच्या या मागण्यांकडे खासदार नारायण राणे यांनी सकारात्मक दृष्टीने लक्ष देऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.











