

चिपळूण ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी रविंद्र पत्याने यांची निवड
चिपळूण, ता. 6 ः चिपळूण तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सावर्डेचे ग्रामपंचायत अधिकारी रविंद्र पत्याने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेचे माजी अध्यक्ष मंगेश पिंगळे यांची विस्तार अधिकारी पदी पदोन्नत्ती झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्षपदी पत्याने यांची एकमताने निवड करण्यात आली.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुक्रवारी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची बैठक झाली. संघटनेचे माजी अध्यक्ष मंगेश पिंगळे यांची पदोन्नत्तीमुळे पद रिक्त झाल्याने नव्या अध्यक्षपद निवडीची चर्चा करण्यात आली. त्यानुसार रविंद्र पत्याने यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली. श्री. पत्याने हे 1994 ला चिपळूण तालुक्यात ग्रामसेवक म्हणून रूजू झाले. त्यांनी तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत विधायक कामकाज केले आहे. खेड तालुक्यातही त्यांनी 7 वर्षे कामकाज केले. सहा महिन्यापुर्वी त्यांची सावर्डे येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांनी चिपळूण तालुका संघटनेत यापुर्वी सचिव म्हणून तर जिल्हा संघटनेत कोषाध्यक्ष म्हणून कामकाज केले आहे. त्यांनी नेहमीच संघटनेच्या कामासाठी योगदान दिले आहे. ग्रामसेवकांच्या प्रश्नांवर देखील त्यांनी सातत्याने आवाज उठवला. आक्रमक आणि अभ्यासू ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांनी लौकीक जपला. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. चिपळूणच्या ग्रामसेवक संघटनेने नेहमीच आपली वैभवशाली परंपरा जपली आहे. सामाजिक कार्यातही या संघटनेने नेहमीच योगदान दिले. पुर परिस्थिती अथवा आपत्तीच्या वेळी नेहमीच संघटनेने मदतीसाठी पुढाकार घेत योगदान दिले आहे. यानिमीत्त माजी अध्यक्ष मंगेश पिंगळे यांची पदोन्नत्ती झाल्याने त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष राहूल कोरडे, महिला उपाध्यक्षा सचिव रोहिदास हांगे, सहसचिव सुप्रिया मालगुणकर,सदस्य मनोहर गायकवाड, श्रीधर भागवत, दिनेश पारधी, वैजयंती राऊत, अक्षय बळे, विश्वास पवार, राणी चव्हाण, जिल्हा सहसचिव संदीप कदम, ग्रामसेवक पतसंस्थेचे व्हा. चेअरमन पराग बांद्रे, संचालिका अर्चना लांजेकर, जिल्हा कौन्सीलर बजरंग हराळे, यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.












