रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीचा दबदबा
शिवसेना, भाजपचा करिष्मा, राजापुरात काँग्रेसचा झेंडा
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगर पालिका आणि ३ नगरपंचायतींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. सत्ताधारी महायुतीने या निवडणुकांमध्ये आपली ताकद सिद्ध करत जिल्ह्यावर आपला स्पष्ट दबदबा निर्माण केला आहे. जिल्ह्यातील चार नगर पालिकांवर शिवसेना (शिंदे गट) तर दोन नगरपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. मात्र राजापूर नगर पालिकेत काँग्रेसने आपला बालेकिल्ला कायम राखत वेगळे चित्र निर्माण केले आहे.
जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तिन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून येणे हे महायुतीसाठी मोठे यश मानले जात आहे. रत्नागिरी नगरपालिकेत शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी विजय मिळवत पुन्हा एकदा शहरावर भगवा फडकवला आहे. चिपळूणमध्ये अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेश सकपाळ यांनी बाजी मारत नगराध्यक्षपद पटकावले. खेड नगरपालिकेत महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचा गड अधिक भक्कम केला आहे. तसेच लांजा नगरपंचायतीत शिवसेनेच्या सावली कुरुप यांनी विजय मिळवून पक्षाचा प्रभाव वाढवला आहे.
दरम्यान, राजापूर नगरपालिकेत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत काँग्रेसचा झेंडा उंचावला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसने राजापूरमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवले असून, हा विजय काँग्रेससाठी दिलासादायक मानला जात आहे.
नगरपंचायतींच्या निकालांकडे पाहता भाजपनेही आपली ताकद दाखवून दिली आहे. देवरुख नगरपंचायतीत भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवला, तर गुहागर नगरपंचायतीत भाजपच्या नीता मालप नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. या निकालांमुळे नगरपंचायतींमध्ये भाजप-शिवसेना महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे.
एकूणच रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल पाहता, महायुतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपला प्रभाव ठळकपणे सिद्ध केला असून, आगामी राजकीय समीकरणांसाठी हे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.










