जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
ग्रीन फिल्ड रस्ता, कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार

चिपळूण : कोकणात मुबलक पाऊस असूनही पाणी वाहून जाते, ते अडवण्यासाठी नियोजन आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई-अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीन फिल्ड रस्ता तयार होत असून त्याचा डीपीआर बनविण्याचे कामही सुरू आहे. कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करून त्याला बळ दिले जाईल. छोटे-छोटे उद्योग कोकणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोकणच्या समृद्धीसाठी जेवढा निधी लागेल तेवढा द्यायची माझी तयारी आहे, त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी, अशी साद घालत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकवा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात मंगळवारी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाशी शिवसेनेचे घट्ट नाते अधोरेखित केले.

कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत नेत्यांची उपस्थिती गरजेची
शिंदे म्हणाले,“शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला असला तरी तिची नाळ कोकणाशी जोडलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. हाच कार्यकर्ता लोकसभा-विधानसभेत जीव ओतून काम करत असतो. म्हणूनच मी स्वतः तुमच्या प्रचारासाठी चिपळुणात आलो आहे.”नगरपालिकेच्या निवडणुकीत चिपळूणकरांनी इतिहास घडवून नगराध्यक्ष निवडून आणला, हीच विजयाची सुरुवात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही’
महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहीण योजना असल्याचे सांगत त्यांनी ठाम शब्दांत स्पष्ट केले की, “कोणी कितीही बोलले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.”या योजनेसाठी दरवर्षी ४५ हजार कोटी रुपये खर्च येत असतानाही सरकारने धाडसाने निर्णय घेतला, असे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यात योग्य वेळी या योजनेतील रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन दिले.“लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभे करून उद्योग-व्यवसायातून ‘लखपती दीदी’ होताना पाहायचं आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विकास हाच अजेंडा; पक्षभेद नाही
शिंदे म्हणाले, “विकास कामांसाठी जो आला त्याला निधी दिला. कधीही पक्षभेद केला नाही. कोकणासाठीही भरघोस निधी दिला.”मुख्यमंत्री असताना अनेक विकास प्रकल्प पुढे नेले, लोकाभिमुख योजना राबवल्या, आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार एकदिलाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, पाणी योजना, रस्ते, नगर पालिकेच्या इमारतीसाठी निधी देण्यात आला, कारण विकास हाच महायुतीचा अजेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘जिथे संकट तिथे शिवसेना’
चिपळूणमधील महापुराची आठवण करून देत त्यांनी संकटाच्या काळात शिवसेना नेहमी जनतेसोबत उभी राहते, अशी ग्वाही दिली.“मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच करत राहीन,” असे भावनिक विधान त्यांनी केले.
कोकणासाठी मोठे प्रकल्प; ग्रीन फिल्ड रस्त्याची घोषणा
कोकणात मुबलक पाऊस असूनही पाणी वाहून जाते, ते अडवण्यासाठी नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई-अलिबाग ते सिंधुदुर्ग-गोवा असा ग्रीन फिल्ड रस्ता तयार होत असून त्याचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. याशिवाय कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण स्थापन करून त्याला बळ दिले जाईल, छोटे उद्योग कोकणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रदूषणकारी प्रकल्पांना सरकारचा विरोध
लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत बोलताना शिंदे म्हणाले,“जनतेच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी प्रकल्प आणण्याचे काम सरकार करणार नाही.”
धरण दुरुस्ती, भूस्खलन आणि निधीची हमी
कळवंडे धरणाच्या दुरुस्तीसाठी निधीची गरज असून आवश्यक तेवढा निधी दिला जाईल. चिपळूण तालुक्यात जिथे भूस्खलन होते तिथे संरक्षक भिंती उभारल्या जातील, विकास कामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.“मी एकदा शब्द दिला की मागे येत नाही,” असे सांगत त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकवण्याचे आवाहन केले.
सदानंद चव्हाण यांना मोठी जबाबदारी
या जाहीर सभेत माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आपल्याला कोणतेतरी काम द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तो धागा पकडून शिंदे यांनी सांगितले की, “सदानंद चव्हाण यांना केवळ काम नव्हे तर मोठी जबाबदारी मिळेल.”असे स्पष्ट केले.
सभेला मान्यवरांची उपस्थिती
या सभेला पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्यासह बाळकृष्ण जाधव, प्रशांत मोहिते, संदेश उर्फ बापू आयरे, रुपेश घाग, दिलीप चव्हाण, राजेश बेंडळ, विनोद भुरण, करामत मिठागरी, सौ. स्वप्ना यादव, निहार कोवळे, लियाकत शाह, वसंत दादा उदेग, अनंत पवार, विनोद झगडे, सौ. धनश्री शिंदे, संदीप सावंत, जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण, शशिकांत मोदी, अंकुश आवले तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितीचे महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश शिंदे यांनी केले. या वेळी असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.












