जनतेच्या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढू : खा. नारायण राणे
जनता दरबारात नागरिकांनी मांडले गाऱ्हाणे
चिपळूण : “चिपळूणवासीयांनी मांडलेले प्रलंबित व कायद्याच्या चौकटीतील प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. जे प्रश्न तत्काळ सुटू शकणार नाहीत, त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी ‘एक्सप्लनेशन’ घेतले जाईल. जनतेच्या विकासकामांसाठी निधी कमी पडला, तर तो खासदार निधीतून दिला जाईल. अखेर हा निधी जनतेचाच आहे आणि तो जनतेच्या सेवेसाठीच वापरला गेला पाहिजे,” अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी चिपळूण येथील जनता दरबारात दिली.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या ‘सहकार भवन’ सभागृहात मंगळवारी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते प्रशांत यादव, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. तत्पूर्वी रेल्वेने चिपळूणला आगमन झाल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राणे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
जनतेच्या प्रश्नांना मिळाले व्यासपीठ
जनता दरबारात नागरिकांनी विविध विकासकामांशी संबंधित विषय मांडले. यात पोलीस विभाग, एस.टी. स्थानक बांधकाम, फेऱ्यांची संख्या, कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, धरण दुरुस्ती, औद्योगिक वसाहतीतील अडचणी, बीएसएनएल टॉवर, धनगरवाड्यांतील रस्ते, परशुराम घाटाची दुरावस्था, गोविंदगड किल्ला–परशुराम रोपवे प्रकल्प, कोकण रेल्वे दुपदरीकरण, वंदे भारत एक्सप्रेसला थांबा, गाळ उपसा, चिपळूण न्यायालय इमारतीचे स्थलांतर आणि म्हाडा जागेच्या मोबदल्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांचा समावेश होता.
या सर्व विषयांवर राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना “काही दिवसांतच तोडगा काढा” अशा सूचना दिल्या.
कार्यक्रमाला प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी अधिकारी उपस्थित होते.
“कार्यकर्ता जनतेला हवाहवासा वाटला पाहिजे” : राणे
यावेळी खा. राणे म्हणाले, “जनतेचे प्रश्न समजून घेणे आणि ते सोडवणे हे कार्यकर्त्याचे मुख्य कर्तव्य आहे. कार्यकर्ता तत्पर, परिपक्व आणि जनतेला हवाहवासा वाटला पाहिजे. जनतेचे समाधान झाल्याशिवाय कार्यकर्त्याने प्रयत्न सोडता कामा नयेत.” जनता दरबारात वाचनालयाचा प्रश्न समोर आला नाही, याचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “वाचनाची सवय जोपासली पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे. आगामी स्थानिक निवडणुका लक्षात घेता, भाजप कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांवर उपाय शोधून जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे. लोकांसाठी वेळ देणारा, सेवा वृत्ती असलेला कार्यकर्ता जनतेला प्रिय होतो आणि त्याच्याच हातात विजय येतो.”
रोजगार व औद्योगिक विकासावर भर
राणे पुढे म्हणाले, “भारत आज जगाच्या नकाशावर वेगाने प्रगती करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगारी, साक्षरता आणि गरीबी या विषयांवर ठोस काम सुरू आहे. तरुणांनी मुंबई-पुण्याच्या ओढीपोटी गाव सोडू नये, तर इथेच उद्योजक व व्यावसायिक बनावे.” ते म्हणाले की, “दोडामार्ग येथे २ हजार एकर जागा राखून ठेवली असून, त्यात ५०० ते १००० इंजिनिअरिंग कारखाने आणण्याचा मानस आहे. यातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल.”
“रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा ठरवावी”
सिंधुदुर्गमध्ये ‘सिंधुदुर्गच्या विकासाची दिशा’ या संकल्पनेखाली मंथन सुरू असल्याचे सांगून राणे म्हणाले, ‘रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची दिशा’ या विषयावर देखील विचारमंथन होणे गरजेचे आहे. यातून तरुण पिढीला दिशा मिळेल, उद्योग वाढतील आणि कोकणाच्या विकासाला नवी गती मिळेल.
प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. विनय नातू, प्रशांत यादव, सतीश मोरे, राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











