WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

खेर्डी बाजारपेठेत चोरट्यांचा धुडगूस!


खेर्डी बाजारपेठेत चोरट्यांचा धुडगूस!

🔴 मध्यरात्री दोन सदनिका फोडल्या

🔴 ७ तोळे सोने व रोकड लंपास

🔴 सीसीटीव्हीत ५ जणांची टोळी कैद

चिपळूण : शहरालगतच्या गावांना अज्ञात चोरांनी ‘टार्गेट’ केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. तालुक्यातील पेढे येथे नुकत्याच घडलेल्या घरफोडीची घटना ताजी असतानाच, शहरानजिकच्या खेर्डी बाजारपेठेत पुन्हा एकदा चोरट्यांनी धडक दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेर्डी येथील एका इमारतीतील दोन सदनिकांमध्ये मध्यरात्री घरफोडी करत चोरट्यांनी तब्बल ७ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

विशेष म्हणजे, या चोरीतील चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पाच जणांची टोळी या घरफोडीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सलग एका आठवड्यात घडलेली ही दुसरी घरफोडीची घटना चिपळूण पोलीस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

खेर्डी बाजारपेठे लगत असलेल्या एका इमारतीत मयूर खेतले यांच्या सदनिकेचा मुख्य दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. खेतले कुटुंबीय गावी गेले असल्याने घरात कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी कपाटे फोडून ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने व सुमारे ७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सावंत कुटुंबियांची सदनिका देखील चोरट्यांच्या निशाण्यावर आली. त्यांच्या घरातूनही रोख रक्कम चोरीस गेल्याचे समोर आले आहे. सकाळी ही बाब निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तोंडाला कापड गुंडाळलेले पाच संशयित चोर दिसून येत आहेत. ओळख लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांच्या हालचाली पोलिसांच्या रडारवर आल्या असून फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.

शहर हद्दीत व मुंबई–गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर चोरीच्या घटनांना आळा बसला होता. मात्र आता पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

पोलिसांकडून रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याचे संकेत देण्यात आले असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!