अनारी ग्रामदेवतेचा १६ मार्चला छबिना उत्सव
चिपळूण : तालुक्यातील अनारी गावच्या ग्रामदेवतेचा पारंपरिक छबिना उत्सव सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली असून गावात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच गावातील गणेश मंदिरापासून ते गावाच्या सुमारे दोन किलोमीटर सीमेपर्यंतचा परिसर विविध रांगोळ्या, कलाकुसर आणि सजावटीने नटविण्यात आला आहे. या दिवशी रात्री १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात छबिना उत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेश मंदिरापासून गावाच्या सीमेपर्यंत ग्रामदेवतेची पालखी वाजत-गाजत आणि पारंपरिक नृत्यांसह नेण्यात येणार आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सोहळा अनवाणी पायांनी साजरा केला जातो.
उत्सव मार्गावर प्रकाशासाठी खोबऱ्यांचा वापर करण्याची पारंपरिक प्रथा या गावात आजही जपली जाते. तसेच गावातील विविध समाजघटकांकडे असलेल्या पारंपरिक जबाबदाऱ्या देखील अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत जागृत देवस्थान म्हणून या ग्रामदेवतेची ओळख असून या उत्सवानिमित्त मुंबई, पुणे तसेच इतर शहरांमध्ये वास्तव्यास असलेले अनारीकर मोठ्या संख्येने गावात दाखल झाले आहेत. दरम्यान, छबिना उत्सवानंतर दि. १८ मार्च रोजी होणाऱ्या ‘शिंपणे’ उत्सवाने शिमगा उत्सवाची सांगता होणार आहे.














