WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

लियाकत शाह, समीर टाकळे, स्वाती देवळेकरांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश


लियाकत शाह, समीर टाकळे, स्वाती देवळेकरांसह कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नेते प्रशांत यादव यांनी केले पक्षात स्वागत

चिपळूण : भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत चिपळूण तालुक्यातील विविध राजकीय पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. खेर्डी येथे आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) मधील पदाधिकाऱ्यांनी भाजपची वाट निवडली.

या पक्षप्रवेशामध्ये चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शिवसेना उबाठाचे माजी उपशहर प्रमुख समीर टाकळे, महिला आघाडी क्षेत्र अध्यक्षा स्वाती देवळेकर, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाच्या माजी युवती जिल्हाध्यक्षा प्रणिता घाडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलचे उपशहर अध्यक्ष मुख्तार पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.


मुख्यमंत्र्यांच्या सभेत होणार होता प्रवेश, पण दौरा रद्द
हा पक्षप्रवेश 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महायुतीच्या प्रचार सभेत होणार होता. मात्र, अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेतील दुर्दैवी निधनामुळे मुख्यमंत्री दौरा तसेच सभा रद्द करण्यात आली. त्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा खेर्डीतच पार पडला.


प्रशांत यादव यांचे कार्यकर्त्यांना बळ देण्याचे आवाहन
पक्षप्रवेश करणाऱ्यांचे स्वागत करताना भाजप नेते प्रशांत यादव म्हणाले की,“भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक व्यक्तींशी माझे वर्षानुवर्षांचे ऋणानुबंध आहेत. आम्ही एकत्र काम केलेले आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ औपचारिक नसून आपुलकीचा आणि विश्वासाचा आहे.” ते पुढे म्हणाले, “मी कार्यकर्त्यांसाठी भाजपमध्ये आलो आहे. त्यांना पुढे घेऊन जाणे हेच माझे ध्येय आहे. प्रवेश करताना माझ्याही मनात काही संभ्रम होता. पण पक्षात आल्यानंतर सर्व शंका दूर झाल्या. भाजपमध्ये सक्षम नेतृत्वाला नेहमीच पाठबळ दिले जाते, टीमवर्कचे उत्तम उदाहरण इथे पाहायला मिळते.”

नगर पालिका निवडणुकीतील अनुभव सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर स्थानिक किंवा वरिष्ठ नेत्यांनी कोणताही हस्तक्षेप केला नाही. सर्वांनी एकजुटीने काम केले आणि त्यामुळेच भाजपला यश मिळाले. हीच पक्षाची शिस्त आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती आहे.” भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नसल्याचे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश करणाऱ्यांना आश्वासन दिले की, “आपल्या ताकदीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे पक्षात न्याय, सन्मान आणि मानाची वागणूक नक्कीच मिळेल.” यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सौ. स्वप्ना यादव, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष व नगर पालिकेतील भाजप गटनेते शशिकांत मोदी, माजी नगरसेवक विजय चितळे, तसेच अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत मोदी यांनी केले, तर आभार बळीराम मोरे यांनी मानले.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!