WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे निधन


सूरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचे निधन

संगीत क्षेत्रातील अजरामर आवाज काळाच्या पडद्याआड

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील ‘सूरसम्राज्ञी’ आशा भोसले यांचं आज रविवारी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी श्वास घेण्यास त्रास आणि प्रचंड थकवा जाणवू लागल्यानं तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं, आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण संगीतविश्वावर, सिनेइंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कधीही न भरून होणारी पोकळी निर्माण झाली आहे. स्व. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. तसेच, आशाताईंवर उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशाताई भोसले यांनी आपल्या अष्टपैलू आवाजाच्या जोरावर तब्बल आठ दशकांहून अधिक काळ संगीतविश्वावर अधिराज्य गाजवले आहे. विविध शैलींमध्ये सहजतेने गाणी सादर करण्याची त्यांची क्षमता हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या सुप्रसिद्ध गायक दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या तर भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण होत. लहान वयातच त्यांनी संगीताचे धडे घेतले आणि अवघ्या दहाव्या वर्षी गायन क्षेत्रात पदार्पण केले. १९४०च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला; मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना संघर्ष करावा लागला.

१९५० च्या दशकात त्यांनी हळूहळू स्वतःची ओळख निर्माण केली आणि १९५७ साली प्रदर्शित झालेल्या नया दौर चित्रपटातील “उडे जब जब जुल्फें तेरी” या गाण्याने त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर संगीतकार O. P. Nayyar आणि R. D. Burman यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली.

१९६० ते १९७० या काळात आशा भोसले यांनी रोमँटिक, कॅबरे, पॉप, गझल, भक्तीगीत, कव्वाली अशा विविध प्रकारातील गाणी गायली. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “ये मेरा दिल” यांसारखी अनेक गाणी आजही लोकप्रिय आहेत. उमराव जान चित्रपटातील गझलांनी त्यांच्या गायकीचा वेगळाच पैलू रसिकांसमोर आणला.

१९९० च्या दशकातही त्यांनी रंगीला चित्रपटातील गाण्यांद्वारे नव्या पिढीत आपली छाप कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू यांसह २० पेक्षा अधिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. उपलब्ध अधिकृत आणि विश्वासार्ह स्रोतांनुसार, आशा भोसले यांनी आपल्या कारकीर्दीत १२,००० ते १३,००० पेक्षा अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. काही अनौपचारिक दाव्यांमध्ये हा आकडा याहून अधिक सांगितला जात असला तरी, निश्चितपणे प्रमाणित आकडा याच मर्यादेत मानला जातो.
त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००), पद्म विभूषण (२००८) यांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावले आहेत.

आजही आशा भोसले यांचा आवाज भारतीय संगीतप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांची कारकीर्द ही भारतीय संगीतसृष्टीतील सुवर्णपान मानली जाते. त्यांच्या निधनबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी श्रद्धांजली वाहिली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!