WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दगा फटका झाल्यास पाणीही फुंकून पिणार – आमदार शेखर निकम


दगा फटका झाल्यास पाणीही फुंकून पिणार – आमदार शेखर निकम

चिपळूण – महायुती होण्यासाठी मी सुरवातीपासून प्रयत्नशील आहे, राष्ट्रवादीला डावलून बैठका झाल्या तरी युती तोडण्याच्या भूमिकेत मी शेवटपर्यंत नाही. विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला महायुतीने मोठी साथ दिली होती. त्याच जाणीवेतून राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळण्यास तयार आहे. तरीही दगा फटका झाल्यास ताकच नव्हे पाणीही फुकून पिऊ असे आमदार निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी भाजपने 12 आणि शिंदे शिवसेनेने 16 जागा घेत युती केली. या पार्श्वभूमीवर आमदार निकम म्हणाले, नगराध्यक्षपदासाठी महायुतीमध्ये एकदिलाने निर्णय व्हायला हवा होता. महायुतीचे उमेदवार एकत्र जाहिर व्हायला हवे होते ते झाले नाही. त्यामुळे नगराध्यक्षपदासह पंधरा जागांवर आमचे उमेदवार उभे आहेत. पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर ठिक नाही तर लढण्याची तयारी आहे. असे आमदार शेखर निकम यांनी आज राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. देवरूख प्रमाणे चिपळूणात महायुती व्हायला हवी होती असेही त्यांनी सांगितले. चिपळूण पालिकेच्या निवडणूकीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून १६ आणि भाजपकडून १२ उमेदवार देण्यात आले. नगराध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचा उमेदवार देण्यात आला. या एकूण प्रक्रियेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आज नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवकपदासाठी १५ जागांवर अर्ज भरण्यात आले. माझा पालकमंत्री आणि भाजपच्या वरिष्ठांवर विश्वास आहे. सुरवातीपासून मी महायुती व्हावी याच भूमिकेत होतो. महायुतीचा १० राष्ट्रवादी, ९ भाजप आणि ९ शिवसेना अशा जागा ठरल्या होत्या. महायुतीचे ठरल्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे दहा जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील पाच जागा पालकमंत्र्यांनी मान्यही केल्या. मात्र ऐनवेळी त्यातील दोन जागा कमी करण्यात आल्या. तरीही या घडामोडींवर तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडून चर्चा अपेक्षित होती. पालकमंत्री शेवटपर्यंत संपर्कात होते. चिपळूण पालिकेच्या निवडणूकीत तिन्ही पक्षाची महायुती होणार असे सांगत होते. मात्र परस्पर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. देवरूखमध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आणण्याची क्षमता असताना देखील आम्ही हे पद भाजपला दिले. तसेच चिपळूणसाठी शिंदे सेनेला नगराध्यक्षपद देण्याचे मान्य केले होते. तरीही राष्ट्रवादीला घेतल्याचे दिसत नाही मात्र अजून वेळ गेलेली नाही. चर्चेतून मार्ग काढता येईल, असेही आमदार निकम यांनी सांगितले.


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!