कीटकनाशक औषध प्राशन केलेल्या व्यक्तीचा मृत्यू
खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील एका ५४ वर्षीय व्यक्तीचा कीटकनाशक औषध प्राशन केल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीचे नाव संतोष गणपत घाडगे (वय ५४, रा. पोफळी, रूम नं. ६४/१, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी रात्री जेवण केल्यानंतर संतोष घाडगे यांनी त्यांच्या घरात वैयक्तिक टेन्शनमध्ये फवारणीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक औषध प्राशन केले. यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा निकिल संतोष घाडगे व इतर नातेवाईकांनी तात्काळ खासगी वाहनाने त्यांना उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल येथे दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले.
रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने सायंकाळी ५ वाजता के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्या वेळेस रुग्णाची कोणतीही हालचाल दिसून न आल्याने त्यांना मुंबईला न नेता उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी (ता. खेड) येथे नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर रात्री २२.१५ वाजता संतोष घाडगे यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ००/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये दि. २४/०१/२०२६ रोजी करण्यात आली असून, पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.











