WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

विश्वविजेती तन्वी रेडीज; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई


विश्वविजेती तन्वी रेडीज; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई

वैयक्तिक आणि सांघिक दोन्ही प्रकारात सुवर्णपदक 

बुधवारी चिपळूण रेल्वे स्थानक ते डीबीजे महाविद्यालय भव्य मिरवणूकीने स्वागत 

चिपळूण : गुजरातमधील अहमदाबाद येथे दि. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप योगासन स्पर्धेत लोटेमाळ गावच्या आणि रेडीज परिवाराच्या कन्या कु. तन्वी रेडीज हिने भारताचे प्रतिनिधित्व करत दैदिप्यमान कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकावले आहे. वरिष्ठ वैयक्तिक गटात आणि सांघिक या दोन्ही प्रकाराने सुवर्ण कामगिरी केली. उद्या बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास तिचे चिपळूणात आगमन होणार असून यानिमित्त चिपळूण रेल्वे स्थानक ते डीबीजे महाविद्यालय दरम्यान सुवर्णपदक विजेती तन्वी रेडीज हिची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीने जगातील तब्बल ७८ देशांतील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग घेतलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट योगकौशल्य, संतुलन, लवचिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर अव्वल स्थान मिळवले. जागतिक स्तरावरील या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत तिने भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. तन्वी ही पाग व्यायामशाळा, चिपळूण येथे प्रशिक्षण घेत असून, तिच्या या यशामागे प्रशिक्षक रणवीर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि अथक परिश्रम लाभले आहेत. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळेच तन्वीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
तन्वीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे लोटेमाळ गाव, डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण, रत्नागिरी जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि देशप्रेमाचे हे सुवर्ण फळ असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

“७८ देशांतील ६०० खेळाडूंमध्ये अव्वल ठरत लोटेमाळच्या कन्येने विश्व जिंकले; पाग व्यायामशाळेच्या शिस्तीने आणि रणवीर सावंत यांच्या मार्गदर्शनाने भारताला मिळवून दिला सुवर्ण गौरव!”

तन्वीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या या कामगिरीमुळे कोकणातील आणि महाराष्ट्रातील असंख्य युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!