चिपळुणात उभारणार मराठा भवन
छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यात निर्धार
चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मराठा समाजासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक मराठा भवन उभारण्याचा निर्धार मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यात व्यक्त करण्यात आला. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या विचारांचा जागर करत समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी मराठा भवनाची गरज अधोरेखित करण्यात आली.

शुक्रवार, ६ जून रोजी चिपळूण येथे मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यालयात तसेच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवगर्जना आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान, न्याय, लोककल्याण आणि संघटनशक्तीचा आदर्श समाजाने जपला पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर चिपळूण तालुक्यातील मराठा समाजासाठी हक्काचे मराठा भवन उभारण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न करण्यात येतील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमास मराठा क्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव उर्फ बाळा कदम, सचिव राजेश कदम, विश्वस्त प्रमोद कदम, सौ. निर्मला जाधव, शिवानी भोसले, रमेश उर्फ बाळू शिंदे, प्रदीप साळुंखे, सुनील चव्हाण, विक्रांत सावंत, संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीर भोसले, सेवादलचे तुळशीराम पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा स्नेहल चव्हाण, सौ. संध्या घाडगे, श्री. घाडगे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शिवरायांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक एकजूट आणि समाजहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.









