WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

दि बॉटनिकल गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस


दि बॉटनिकल गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस

आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण

चिपळूण : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई (दि बॉटनिकल गार्डन) येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि स्थानिक देवराईचे जतन या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विविध शासकीय विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवळ वृक्षारोपण न करता देवराईच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदान करण्यात आल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या उपक्रमात प्रांत आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह महसूल विभाग, कृषी विभाग, चिपळूण नगर पालिका तसेच पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी मिळून देवराई परिसराची स्वच्छता मोहीम राबवली तसेच झाडांच्या वाढीसाठी गांडूळ खत टाकण्याचे काम केले. त्यामुळे परिसर अधिक सुशोभित आणि संवर्धित झाला.

कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील ‘यशराज गांडूळ खत प्रकल्प’ यांनी देवराईतील झाडांसाठी तब्बल १२०० किलो गांडूळ खत मोफत उपलब्ध करून दिले. या योगदानामुळे झाडांच्या संगोपनाला मोठी चालना मिळणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात लावलेल्या झाडांनी चांगली वाढ केल्याने त्यांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. या निमित्ताने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत भविष्यातही देवराईचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

या उपक्रमामुळे कळंबस्ते येथील देवराईला नवसंजीवनी मिळाली असून पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!