गोवळकोट शाळेच्या आरक्षित जागेचा मुद्दा नगरसेवकांच्या कोर्टात
सुनावणीत ग्रामस्थांनी घेतली आक्रमक भूमिका
आदर्श शाळा मॉडेल स्वरूपात उभारण्याची मागणी
चिपळूण : गोवळकोट येथील शाळा व प्ले ग्राउंडच्या आरक्षित जागेची सुनावणी नगर पालिकेमध्ये मंगळवारी पार पडली. आरक्षण ठेवायचे की रद्द करायचे हे आता नगरपालिकेच्या मुख्य सभेत निश्चित होणार आहे. त्यानंतर तो निर्णय शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या सुनावणीमध्ये हरकत घेतलेल्या ग्रामस्थांच्या वतीने ऍड.अशोक निकम यांनी आक्रमक बाजू मांडली व आपले लेखी म्हणणे सादर केले. त्यांनी मुख्याधिकारी व नगर रचनाकार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी प्रशासनाच्या विसंगतीमुळे काहीकाळ अधिकारीही गोंधळले. नगररचना अधिकारी नम्रता खेरमुडकर यांनी प्रशासनाचा गोपनीय अहवाल देण्यास नकार दिल्याने ऍड. अशोक निकम, नगरसेवक साजिद सरगुरोह, ग्रामस्थ संदीप बांद्रे, वसंत हरवडे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ठरावातील तारखेची विसंगती उघडकीस आणली. त्यामुळे मुख्याधिकारी जाधव यांनी अखेर त्या गोपनीय अहवालचे वाचन करण्यास सांगितले.
ऍड. निकम यांनी गोवळकोट भागातील जेवढ्या शाळा आहेत त्यांना क्रिडांगण नाही, मराठी माध्यमाचे विद्यार्थी उर्दू शिकणार का? आरक्षण उठविले तर 0 ते 5 वयोगटातील 258 मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण होईल. जमीन मालक अस्मा खतीब यांनी एकाच वेळी 4 मालमत्ता खरेदी केल्या आहेत त्यामुळे त्या भूमिहीन किंवा बेघर कशा होणार? 2019 पासून या भागाला नगरसेवकच नसल्यामुळे आरक्षण विकसित करता आले नाही. मूळ जागा मालक जोशी यांचे 2 वेळा आरक्षण उठवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले. हे माहिती असतानाही खतीब यांनी जागा खरेदी का केली? नगर पालिकेने त्या जागेवर भराव कोणत्या उद्देशाने केला आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करून अनेक महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. नगरसेवक सरगुरोह यांनी सर्व शाळा मिळून आम्हाला तेथे एक आदर्श शाळा मॉडेल स्वरूपात उभारायची आहे हे नमूद केले. शेवटी मुख्याधिकारी जाधव यांनी आम्ही प्रत्यक्ष जागेवर जाऊन तसा प्रस्ताव कौन्सिल समोर ठेवू असे स्पष्ट केले.
या सुनावणीला गावातील नगरसेविका मिसबाह नाखुदा, वसंत हरवडे, संदीप बांद्रे, विजय खापरे, मुरलीधर बुरटे, दीपक निवाते, किरण बांद्रे, मंगेश भैरवकर, असगर नाखुदा, सुनील हरवडे, अनिस कदम, रोहित कदम, सुवर्णा खोपडकर, तुषार रेडीज, इनायत मुकादम व लगतचे जागा मालक चौगुले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












