मुंबई-गोवा महामार्गावरील अवैध पार्किंगमुळे अपघातांचा धोका वाढला
कशेडी बोगदा ते चिपळूणदरम्यान तातडीने कारवाईची भाजपाची मागणी
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर कशेडी बोगदा ते चिपळूण या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यासंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे यांना निवेदन देत तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपाच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावर अनेक ठिकाणी ट्रक, कंटेनर व इतर अवजड वाहने दीर्घकाळ उभी राहत असल्याने वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या वाहनांमुळे अपघाताचा धोका अधिक वाढत असून अनेकदा किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहेत.
तसेच भरणे नाका येथील पुलाखाली अवैधरित्या करण्यात आलेल्या पार्किंगमुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांना व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.
यावेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ऍड. वैभव खेडेकर, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्यांक रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहिम सहिबोल, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ऍड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, विजय गुप्ता, ओवैस चौगुले आदी उपस्थित होते.
महामार्गावरील वाढत्या वाहतूक समस्येमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतूनही होत आहे.












