जमिनीच्या वादातून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण : तालुक्यातील निरबाडे गावात जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना रविवारी (दि.१५ मार्च २०२६) दुपारी घडली. या मारहाणीत तो व्यक्ती जखमी झाला असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वानंद भीम महाडिक (वय ४८, व्यवसाय नोकरी, रा. निरबाडे पश्चिमवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी; सध्या प्लॉट क्र.२१, सेक्टर १६, कळंबोळी, नवी मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास निरबाडे पश्चिमवाडी येथील कमानीजवळील रस्त्यावर घडली. या प्रकरणी रोहन विलास महाडिक, विशाल विलास महाडिक आणि दयानंद भीम महाडिक (तिघेही रा. निरबाडे पश्चिमवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी विश्वानंद महाडिक हे त्यांच्या निरबाडे येथील जमिनीमध्ये सपाटीकरणासाठी डबर टाकून चिपळूणहून गाडीने येत असताना, रोहन महाडिक व विशाल महाडिक यांनी जमिनीच्या वादातून राग धरून त्यांची गाडी रस्त्यावर थांबवली. त्यानंतर फिर्यादींना खाली उतरवून विशाल महाडिक याने हाताने डोळा, कान आणि नाकावर थापड मारून मारहाण केली. तर रोहन महाडिक याने हातातील काठीने फिर्यादींच्या हाताच्या दंडावर, पायावर आणि पाठीवर मारून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, फिर्यादींचा सख्खा भाऊ असलेला दयानंद भीम महाडिक यानेही शिवीगाळ करून “तुला बघून घेतो” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेत विश्वानंद महाडिक हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १५ मार्च रोजी सायंकाळी ७.१६ वाजता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.














