WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

पाग चौकात आज शिमगोत्सवाचा जल्लोष


पाग चौकात आज शिमगोत्सवाचा जल्लोष

‘डीजे’वर थिरकणार तरुणाईची पाऊले 

चिपळूण : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पाग गोरिवलेवाडी क्रीडा मंडळातर्फे आज दि. ४ मार्च रोजी रात्री ९ वाजता शिमगा महोत्सवाचा जल्लोष रंगणार आहे. यंदा पाग चौकात पहिल्यांदाच भव्य आणि दिव्य स्वरूपात हा सोहळा आयोजित करण्यात आला असून संपूर्ण परिसर सणाच्या उत्साहाने दुमदुमून जाणार आहे.

या महोत्सवात श्री देव नवा कालभैरव देवस्थान यांच्या पालखीचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक जल्लोषात पालखी आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ग्रामस्थांसाठी हा क्षण विशेष आकर्षणाचा ठरणार आहे.

यंदाच्या शिमगोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे कोल्हापूरचे प्रसिद्ध ‘पद्मावती लाईट’ यांची आकर्षक रोषणाई, नयनेश साऊंडची दमदार ध्वनीव्यवस्था आणि ऑपरेटर डीजे गणेश यांचा जल्लोषमय ठेका. आधुनिक साऊंड सिस्टिम आणि नेत्रदीपक लाईटिंगमुळे पाग चौकात उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. तरुणाईसह ग्रामस्थांची पावले डीजेच्या गाण्यांवर थिरकणार असून शिमगोत्सवाचा आनंद द्विगुणित होणार आहे.

विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम गुलालमुक्त असणार आहे. पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने शिमगा साजरा करण्याचा मंडळाचा निर्धार असून त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

या शिमगा महोत्सवासाठी पाग गोरिवलेवाडी क्रीडा मंडळाच्या शिलेदारांनी जय्यत तयारी केली असून पाग परिसरात सणाचा रंग चढला आहे. आज रात्री पाग चौकात शिमगोत्सवाचा जल्लोष अनुभवण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे चित्र आहे.

 


612
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!