काँग्रेस पक्षाचे आजपासून निवासी प्रशिक्षण शिबीर
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नेते, तज्ज्ञ मार्गदर्शन करणार
चिपळुणात कार्यक्रमाची तयारी पूर्ण
रत्नागिरी : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा आज शुक्रवार दिनांक २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूण येथील धवल घाग व्यापारी संकुल येथे पार पडणार असून या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील उमेदवार सहभागी होणार आहेत.

या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.
काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या शिबिरात सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
चिपळुणातील कार्यशाळेचा समारोप रविवार दि. 1 मार्च रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास उत्तर रत्नागिरी व दक्षिण रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुपारी 12.30 वाजता आवर्जून उपस्थित रहावे. प्रांताध्यक्षांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घ्यावयाचा असेल अथवा प्रांताध्यक्षांचा सत्कार करायचा असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.
सोनललक्ष्मी घाग, जिल्हाध्यक्षा
उत्तर रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी












