गुंगीचे औषध देऊन गोवंश तस्करीचा प्रयत्न?
🔴स्थानिकांच्या धाडसाने अनर्थ टळला
🔴परशुराम (दुर्गवाडी) येथे पहाटेची घटना
🔴चार गाई व एक बैलावर उपचार सुरू
चिपळूण : तालुक्यातील परशुराम (दुर्गवाडी) परिसरात गोवंश तस्करीसाठी गुंगीचे औषध देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना दि. २५ रोजी पहाटे सुमारे ३ ते ३.३० वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची XYLO चारचाकी गाडी परिसरात संशयास्पदरीत्या घिरट्या घालत होती. संबंधितांनी परिसरातील गाईंना गुंगीचे औषध दिल्यानंतर त्या बेशुद्धावस्थेत गेल्यावर गाडीत भरून नेण्याची तयारी सुरू केली होती.

हा प्रकार परशुराम येथील रहिवासी श्री. सचिन पावसकर आणि रामचंद्र सीताराम हुमणे यांच्या निदर्शनास आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ही बाब आजूबाजूच्या नागरिकांना सांगून तत्काळ धाडस दाखवत घटनास्थळी धाव घेतली.स्थानिक नागरिकांना पाहताच झायलो गाडीतील संबंधितांनी तेथून पळ काढला. त्याच वेळी स्थानिकांनी दुसऱ्या गाडीने पाठलाग करून झायलो गाडीवर दगडफेक केली. यामध्ये झायलो गाडीची मागील काच फुटली. आपल्याला कोणी पाहिले असल्याचे लक्षात येताच वाहनचालकाने गाडी भरधाव वेगाने (सुमारे ७० ते ८० किमी प्रतितास) लोटे MIDCच्या दिशेने पळवून नेली. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे वाहन क्रमांक नोंदवता आला नाही.
या घटनेत चार गाई व एक बैल असा एकूण पाच जनावरांचा समावेश असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. वेळेवर स्थानिकांनी धाडस दाखवल्यामुळे गोवंश तस्करीचा पुढील अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर पृथ्वीराज पवार यांनीही संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबतची फिर्याद सचिन पावसकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दिली असून त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












