चिपळुणात ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी गौरव पाटेकर
चिपळूण : नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकीत ठाकरे सेनेच्या ४ शिलेदारांनी बाजी मारली. यामधील माजी सभापतींचा मोठ्या मताधिक्याने पराभव करणारे तरूण नेतृत्व गौरव पाटेकर यांची ठाकरे सेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. याबद्दल मंगळवारी झालेल्या मेळाव्यात पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते गौरव पाटेकर यांचा सत्कार करण्यात आला.
रामपूर येथील गौरव पाटेकर हे आमदार जाधव यांचे खद्दे समर्थक मानले जातात. बीएमएसचे शिक्षण घेतलेल्या पाटेकर यांनी प्रथमच पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. २००९ पासून ते पक्षाचे सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्ता राहिले आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक कार्याची सुरुवात केली. २००९ ते २०२५ या कालावधीत तालुकास्तरीय विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. पक्ष संघटन बळकट करणे, जनसंपर्क वाढविणे व निवडणूक नियोजनात सक्रीय भूमिका बजावणे, विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली आहे. उमरोली पंचायत समिती गणात २०२१ पासून उपविभाग प्रमुख पदावर काम केले. उमरोली गणातून प्रथमच लढताना त्यांनी माजी सभापती जितेंद्र चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत बाजी मारली. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य व स्वच्छता मोहिमा, युवक व महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व पाठपुरावा, व्यावसायिक कंत्राटदार म्हणून दर्जेदार विकासकामे – रस्ते, पाणीपुरवठा, गटारे व इतर मूलभूत सुविधा उभारून जनजीवन सुलभ करण्यासाठी योगदान, स्थानिक रोजगार निर्मितीस चालना देत ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व जनजागृती अभियान राबवल्याने मतदारांनी त्यास पसंती दिली. आगामी काळात पारदर्शक, जबाबदार व लोकाभिमुख प्रशासन, ग्रामीण भागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास, शेती, पर्यटन व रोजगारनिर्मितीला चालना, युवकांना नेतृत्व व संधी देण्याचा मनोदय व्यक्त केला.










