भरधाव कंटेनरने पादचाऱ्याला चिरडले
🔴मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे भीषण अपघात
🔴पादचाऱ्याचा जागीच मृत्यू
🔴पोलिसांनी पाठलाग करून चालकाला पकडले
चिपळूण : सावर्डे येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर मंगळवारी दुपारी भरधाव कंटेनरच्या धडकेत १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनर चालकाचा पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद सुंदर हेबरम (१७, रा. झारखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर पांजल अजय बिर्या (रा. मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. आनंद हा काही दिवसांपूर्वी सावर्डे येथे आपल्या चुलत भावाकडे कामानिमित्त आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास सावर्डे येथील जुने पोलीस स्थानक परिसरात आनंद रस्ता ओलांडत होता. त्याच वेळी गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत आनंदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक पांजल बिर्या हा कंटेनरसह घटनास्थळावरून गोव्याच्या दिशेने पसार झाला. मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करत त्याचा पाठलाग केला आणि अखेर त्याला अडवून ताब्यात घेतले. त्याच्यावर सावर्डे पोलीस स्थानकात संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती समजताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. मृत आनंद हेबरम याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठविण्यात आला.
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या परिसरात वाहने कायम भरधाव वेगाने धावत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. येथे गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाने अद्याप त्याची दखल घेतलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वेळेत गतीरोधक बसविण्यात आला असता तर हा अपघात टळला असता, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. या घटनेनंतर तरी संबंधित विभाग जागा होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.











