WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात लवकरच भव्य मोर्चा


‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात लवकरच भव्य मोर्चा

🔴कोकण पर्यावरण संघर्ष समितीचा इशारा

🔴माजी खासदार हुसेन दलवाई यांची पत्रकार परिषदेत माहिती 

चिपळूण : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज कंपनीविरोधात कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून लवकरच परिषद घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केली. मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दलवाई म्हणाले की, संबंधित कंपनी सरकार आणि काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच सुरू झाली असून येथे घातक रसायनांचे उत्पादन घेतले जात आहे. याची पूर्ण कल्पना शासनाला आहे. काही दिवसांपूर्वी लोटे येथे भेट दिलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनी कोकणसाठी हानिकारक ठरत असेल तर ती बंद केली जाईल, असे विधान केले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची टीका दलवाई यांनी केली. “जर सरकारला कंपनी घातक आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर आमच्याशी चर्चा का केली जात नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारच्या भूमिकेची वाट न पाहता आता ग्रामस्थांना सोबत घेऊन एकत्रित लढा उभारला जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी सध्या गावागावांत बैठका घेऊन बाधित नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. आतापर्यंत आयनी, असगणी, दाभिळ, मेटे, कोतवली, घाणेकुंट, सात्विनगाव, लवेल, सोनगाव आणि मालदोली या गावांमध्ये बैठका पार पडल्या असून ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या लढ्याला एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे.

लवकरच सर्व गावांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर परिषद घेण्यात येईल. या परिषदेत महत्त्वाचे ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवण्यात येणार असून कंपनीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लढ्यात सर्वांनी निपक्षपातीपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही दलवाई यांनी केले.

ग्रामसभांमध्ये नागरिकांकडून गंभीर आरोग्य समस्यांची माहिती समोर येत असल्याचे दलवाई म्हणाले. काहींना कर्करोग, पक्षाघातासारखे आजार होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चार दिवसांपूर्वी सोनगाव येथे चार जनावरे दगावल्याची घटना समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र या सर्व प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“हा लढा कोकण वाचवण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी आहे. संघर्ष समितीतील कोणताही कार्यकर्ता कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केली तरी आम्ही पुढे राहू; पहिली काठी आम्ही खाऊ, जेलमध्येही आम्ही जाऊ. मात्र नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे ठाम प्रतिपादन दलवाई यांनी केले.

यावेळी संघर्ष समितीचे समन्वयक भरत लब्धे, पर्यावरण अभ्यासक पंकज दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदूलकर, तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!