शौर्य वनगेचे ‘सुवर्ण’ यश
चिपळूण : तालुक्यातील आकले धामणखोरी–निंबारेवाडी येथील शौर्य प्रसाद वनगे याने नगर येथे झालेल्या शालेय विभागीय युनिफाईड कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. या यशामुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेत शौर्यने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. शौर्य हा माजी सरपंच कै. बाबाजी महादेव वनगे यांचा नातू असून तो संकल्प फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा विद्यार्थी आहे. या यशामागे संकल्प स्पोर्ट्सचे सचिव चंद्रकांत राहींज, वैशाली बांगर, योगेश वागस्कर, सुप्रिया तिर्लोटकर यांचे मार्गदर्शन लाभले. शौर्य सध्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शनिवार पेठ येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे.
शौर्यच्या या उल्लेखनीय यशामुळे आकले गावाचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते सामाजिक विकास ग्रुपकडून शौर्यच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व कौतुक करण्यात आले











