डिजिटल अरेस्टच्या नावाखाली १ कोटी २३ लाखांची सायबर फसवणूक
एका आरोपीस अटक
रत्नागिरी : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये धक्कादायक बाब समोर आली असून, “डिजिटल अरेस्ट” या नव्या पद्धतीने एका नागरिकाची तब्बल ₹१ कोटी २३ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस दलाच्या सायबर पोलिसांनी वेळीच कारवाई करत मुंबईतून एका आरोपीस अटक केली आहे.

या गुन्ह्यातील आरोपीने स्वतःला बेंगलोर पोलीस तसेच नवी दिल्ली येथील सी.बी.आय अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादीला जाळ्यात ओढले. आरोपीने फिर्यादी यांना त्यांच्या कॅनरा बँक, माटुंगा (मुंबई) येथील खात्यातून ३ कोटी रुपयांचा फ्रॉड झाल्याची भीती घातली. याप्रकरणी चौकशी सुरू असून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादीवर मानसिक दबाव टाकला.
“तपासात सहकार्य न केल्यास अटक होईल” अशा धमक्या देत आरोपीने दि. ०४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत वेळोवेळी पैशांची मागणी केली. या काळात फिर्यादीकडून ₹१,२३,००,०००/- (एक कोटी तेवीस लाख रुपये) उकळण्यात आले.
गुन्हा दाखल, तपासाला वेग
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथे गुन्हा रजिस्टर नं. ०७/२०२६ (दापोली पोलीस ठाणे) अन्वये पुढील कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(२), ३१८(४), ३१९(२), ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(ड) बँक व्यवहार व तांत्रिक विश्लेषणातून आरोपी निष्पन्न
गुन्ह्याच्या तपासात फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बँकांकडून प्राप्त माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी निष्पन्न झाला. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथील विशेष तपास पथक मुंबई व ठाणे येथे रवाना करण्यात आले.
स्थानिक बातमीदारांची मदत घेऊन तपास अधिक मजबूत करत दि. २३ जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता ४ दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) मंजूर करण्यात आली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे
अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी येथील
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता सुतार
पो.हवा/1040 संदीप नाईक
पो.कॉ/739 सौरभ कदम
पो.कॉ/74 रोहन कदम
पो.कॉ/327 निलेश शेलार
यांनी या गुन्ह्याच्या तपासात मोलाची भूमिका बजावली.
🚨 नागरिकांसाठी पोलीस दलाचे आवाहन
रत्नागिरी पोलीस दलातर्फे नागरिकांना कळविण्यात येते की –
“कोणीही पोलीस, सी.बी.आय, नॅशनल सिक्युरिटी विभाग किंवा इतर शासकीय अधिकारी असल्याचे सांगून फोनवरून तुमचे बँक खाते, सिम कार्ड गैरवापरात असल्याचे सांगत असेल, चौकशीच्या नावाखाली वैयक्तिक किंवा बँक माहिती मागत असेल अथवा अकाऊंट व्हेरीफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत असेल, तर अशा कॉलवर विश्वास ठेवू नका.”
आपली वैयक्तिक व बँक खात्यांची माहिती कोणालाही देऊ नका.
अशा प्रकारची शंका आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधा.
या गुन्ह्याचा अधिक तपास सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरी करत आहे.












