शहराबाहेरील विक्रेत्यांवर थेट कारवाई
नगराध्यक्षांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची धडक मोहीम
चिपळूण : शहरात शहराबाहेरील विक्रेत्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही, असा ठाम इशारा नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी यापूर्वीच व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला होता. मात्र, तरीही गुरुवारी सकाळी शहरात बाहेरील विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या असल्याचे फोटो व पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नगराध्यक्षांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित प्रशासनाला जाब विचारत तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर प्रशासनाने त्वरित शहरात धडक मोहीम राबवत शहराबाहेरील सर्व फिरते विक्रेते व त्यांच्या गाड्या शहराबाहेर हटवल्या.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “स्थानिक व्यापाऱ्यांचे हित हेच आमचे प्राधान्य आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”
या कारवाईमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेणाऱ्या नगरपालिकेच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत आहे.














