शौर्य वनगेची ‘सुवर्ण’ कामगिरी!
चिपळूण : आकले धामणखोरी – निंबारेवाडी (ता. चिपळूण) येथील शौर्य प्रसाद वनगे याने धुळे येथे पार पडलेल्या १२व्या राज्यस्तरीय तेंग सु डो कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत शौर्यच्या उत्तुंग कामगिरीमुळे त्याची डेहराडून येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शौर्य हा माजी सरपंच कै. बाबाजी महादेव वनगे यांचा नातू असून सध्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शनिवार पेठ, पुणे येथे इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत आहे. तो संकल्प फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा विद्यार्थी आहे.
या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. संकल्प सपोर्ट संस्थेचे सचिव चंद्रकांत राहींज, वैशाली बांगर, योगेश वागस्कर व सुप्रिया तीर्लोटकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले.
शौर्य वनगेच्या या यशामुळे आकले गावाचे नाव उज्वल झाले आहे. समाजसेवक विनेश भाऊ मोहिते यांच्या सामाजिक विकास ग्रुप तर्फे शौर्यचे अभिनंदन करण्यात आले असून, त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.













